मुंबई : मुंबईकरांना व विशेषतः लहान मुलांना दिवाळीच्या सुटीचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने घेता यावा, या उद्देशाने दिवाळीदरम्यान असणाऱ्या सार्वजनिक सुट्टयांच्या दिवशी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. याअंतर्गत ‘बलिप्रतिपदा, दीपावली, पाडवा’निमित्त बुधवार, २२ ऑक्टोबर व ‘भाऊबीज’निमित्त गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुटी आहे. मात्र, असे असले तरी २२ व २३ ऑक्टोबर रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे; तर शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी बंद असणार आहे, असे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले ठेवले जाते. या ठरावानुसार, येत्या २२ व २३ ऑक्टोबर रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे.