मुंबई : रिक्षाचालकांनी मोबाईल फोनवर वा व्हिडिओ कॅालवर बोलत गाडी चालवणे हे उपनगरात नित्याचेच झाले आहे. अशाच एका रिक्षा चालकाविरुद्ध मिळालेल्या तक्रारीवरुन अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागाने तातडीने दंडात्मक कारवाई केली आहे. या रिक्षा चालकाला अडीच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मोबाईल फोनवर बोलणाऱ्या रिक्षा चालकांविरुद्ध

अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वेळोवेळी मोहिम राबविली. तरीही या रिक्षा चालकांमध्ये काहीही फरक पडला नसल्याचे दिसून येत आहे. एका प्रवाशाने असाच एक रिक्षा चालक गाडी (एमएच ०२ जीएल ०५६५) चालवत असताना मोबाईलवरील व्हिडिओ कॅालवर बोलत असल्याचे छायाचित्र या कार्यालयाला पाठवले. या कार्यालयाने या छायाचित्रांत दखल घेत संबंधित रिक्षा चालक मोहम्मद अनारकली हक यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. वाहतूक निरीक्षक जितेंद्र लोंढे यांनी या रिक्षा चालकाला अडीच हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही तक्रार पुराव्यासह केल्याबद्दल परिवहन विभागाने प्रवाशाचे आभार मानले आहेत. प्रवाशांनी अशा रीतीने पुढाकार घेतला तर निश्चितच रिक्षाचालकांना वचक बसेल, असे अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गुणवंत निकम यांनी सांगितले.

तक्रारीसाठी क्रमांक

परिवहन कार्यालयाच्या ९९२०२४०२०२ या व्हॅाटस् अप क्रमांकावर प्रवासी थेट तक्रार देऊ शकतात. तक्रार दाखल करताना तारीख, वेळ, ठिकाण व गाडी क्रमांकाच्या छायाचित्रासह तपशील द्यावा, असे आवाहन निकम यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७८ लाखांहून अधिक दंड!

टॅक्सी, रिक्षा तसेच उल्लंघन करणाऱ्या चालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही दंडात्मक कारवाई केली जाते. गेल्या महिन्याभरात अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ७८ लाखांहून अधिक दंड कारवाईद्वारे गोळा केला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गाडी चालकांविरुद्ध नागरिकांनी पुढाकार घेतला तर संबंधित चालकांना निश्चितच वचक बसेल, असा विश्वासूही त्यांनी व्यक्त केला.