मुंबई : मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जून २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार जे. एम. अभ्यंकर विजयी झाले होते. त्यांच्या निवडणुकीला दुसऱ्या क्रमांकावरील शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष सावित्री किसन मोरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तथापि, अभ्यंकर यांनी मोरे यांची याचिका फेटाळण्याच्या मागणीसाठी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. त्यामुळे, अभ्यंकर यांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या मोरे यांच्या याचिकेवर न्यायालय सुनावणी घेणार आहे.

न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठाने मोरे यांनी अभ्यंकर यांच्या आमदारकीविरोधात दाखल केलेली निवडणूक याचिका रद्द करण्याची मागणी फेटाळली. तसेच मोरे यांची याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेत असल्याचे स्पष्ट केले. अभ्यंकर यांनी अपात्र व्यक्तींची मतदार म्हणून बेकायदेशीरपणे नोंदणी केल्याच्या आरोपांवरील आक्षेपांबाबत मोरे यांच्या निवडणूक याचिकेत पुरेशी आणि महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे अभ्यंकर यांच्यावर मोरे यांनी निवडणूक याचिकेद्वारे केलेले आरोप सिद्ध झाले, तर या निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम होईल. तसेच, या पुराव्यांच्या आधारे आवश्यक ती कारवाई केली जाऊ शकते, असे एकपीठाने मोरे यांची निवडणूक याचिका रद्द करण्याच्या मागणीसाठी अभ्यंकर केलेला अर्ज फेटाळताना प्रामुख्याने स्पष्ट केले.

दरम्यान, अभ्यंकर यांच्या वतीने वकील वरिष्ठ एम. एम. वशी, तर मोरे यांच्या वतीने वरिष्ठ वकील राजीव पाटील आणि सचिन पुंडे यांनी युक्तिवाद केला होता. त्यांच्या युक्तिवादानंतर एकलपीठाने मार्चमध्ये अभ्यंकर यांच्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


मोरे यांच्या याचिकेतील दावा

मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निकाल १ जुलै २०२४ रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत पहिल्या फेरीच्या मतमोजणीदरम्यान विजयी उमेदवार अभ्यंकर यांना ३०७९ मते, तर मोरे यांना ३०११ मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमध्ये केवळ ६८ मतांचा फरक होता. हा फरक शेवटून दुसऱ्या फेरीत २०८ मतापर्यंत गेला. अभ्यंकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मुख्याध्यापकांमार्फत ५८७ अपात्र मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप मोरे यांनी अभ्यंकर यांच्या निवडणुकाला आव्हान देणाऱ्या याचिकेत केला आहे. तसेच, या अपात्र मतदारांमध्ये शिशुवर्ग, पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि काही शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे. काही मतदारांचे वय १८ ते २५ वर्ष असून त्यांना किमान तीन वर्षांचा शिकवण्याचा अनुभव देखील नाही, असेही मोरे यांनी याचिकेत अधोरेखीत केले आहे. तसेच, अभ्यंकर यांची निवड रद्द करून आपल्याला विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणी मोरे यांनी केली आहे.