मुंबई : शालेय शिक्षण विभागाने यंदा प्रथमच नारळी पौर्णिमेच्या दिवशी सुटी जाहीर केली होती, मात्र त्यानंतर येणारा गोपाळकाला आणि अनंत चतुर्दशीची सुटी यंदा रद्द करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक संताप व्यक्त करीत आहेत. पूर्वीप्रमाणेच यंदाही गोपाळकाला, अनंत चतुर्दशीची सुटी कायम ठेवावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात शिक्षक संघटनेकडून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदनही देण्यात आले आहे.

राज्य सरकारने यंदा अचानक नारळी पौर्णिमेच्या दिवशी सुटी जाहीर केली. त्यामुळे नागरिकांना नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन अशा दोन्ही सुट्या लागून मिळाल्या. पण त्यानंतर सरकारने गोपाळकाला, अनंत चतुर्दशीची सुट्टी रद्द केली. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केले जाते. मुंबईत या दोन्ही सणांच्या दिवशी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे वाहतुकीमध्ये बदल करण्यात येतात. तसेच अनेक ठिकाणचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येतात. रस्ते बंद केल्याने वाहतूक कोंडी होते.

दरवर्षी या दोन्ही दिवशी देण्यात येणारी सुटी रद्द करण्यात आल्यामुळे शाळेत जाताना विद्यार्थी व शिक्षकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. गर्दीमधून वाट काढत विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत जावे लागणार आहे. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी या दिवशी अनुपस्थित राहण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे १६ ऑगस्ट रोजी दहीहंडीच्या दिवशी आणि ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीची रद्द केलेली सुट्टी पूर्वीप्रमाणे कायम ठेवावी, अशी विनंती भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.