मुंबई : जी. एस. बी टेम्पल ट्रस्टतर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त बुधवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत बाणगंगा तलावाकाठी महाआरती आयोजित करण्यात आली आहे. या महोत्सवासाठी तब्बल २४२ कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. तसेच, भाविकांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी ट्रस्टने यंदा भाविकांची ऑनलाईन नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला भाविकांचा प्रतिसादही मिळात असून बाणगंगा तलावाच्या काठी महाआरतीसाठी संबंधितांची लगबग सुरू आहे.

वाळकेश्वर येथील बाणगंगा तलावाला धार्मिकदृष्ट्या व पुरातन वास्तू म्हणून विशेष महत्व आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५ नोव्हेंबर रोजी जीएसबी टेम्पल ट्रस्टतर्फे ‘बाणगंगेची महाआरती’चे आयोजन करण्यात आले आहे. बाणगंगा तलावाच्या काठावर हजारो दिवे लावून तलावाची आरती केली जाते. हे पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. महोत्सवानिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा भाविकांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे. जीएसबी टेम्पल ट्रस्टने या कार्यक्रमाचा तब्बल २५२ कोटींचा विमा उतरवला आहे. दक्षिण मुंबईतील वाहतुकीची अडचण लक्षात घेऊन पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. मात्र, स्थानिक आमदार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हस्तक्षेप केल्यांनतर या महाआरतीचा मार्ग मोकळा झाला.