मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून संयुक्त अरब अमिराती निघालेल्या दोन प्रवाशांना अडवून इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांची कसून तपासणी केली. दोघांच्या पारपत्रातील वय व त्यांचे प्रत्यक्ष वय यामध्ये तफावत आढळली, त्यानंतर या प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले. बंगळुरूमधील रहिवासी लाल मोहम्मद (५७) आणि बिहारमधील इमाम हुसेन (५९) यांच्या पारपत्रामध्ये अनुक्रमे वय ४६ आणि ४९ वर्षे नमुद करण्यात आले होते. सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी नवीन पारपत्र मिळवताना बनावट जन्म प्रमाणपत्राचा वापर केला होता. तपासणीत ही बाब उघड झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याच्या आरोपाखाली अटक केली. दोन्ही आरोप सध्या पोलीस कोठडीत आहेत.
नोकरी मिळवण्या वय कमी दाखवले
आखाती देशांत कामासाठी जाणाऱ्या व्यक्तीचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे असा नियम आहे. आपले वय ५० वर्षांपेक्षा अधिक असल्यामुळे आखाती देशात नोकरी मिळणे अशक्य होते. त्यामुळे त्यांनी जुने पारपत्र लपवून नवीन पारपत्रासाठी बनावट कागदपत्रे सादर केली. त्यांनी नवीन पारपत्र बनवून घेतले, असे या दोघांनी इमिग्रेशन अधिकाऱ्यांना चौकशीत सांगितले. मात्र इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी दोघांची लबाडी पकडली. त्यानंतर सहार पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेऊन फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे व पारपत्र कायद्याअंतर्गत दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. याप्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वयामध्ये १७ वर्षांचा फरक
लाल मोहम्मद याचा जन्म १९६७ मध्ये झाला होता. त्याबातची माहिती लाल मोहम्मदच्या जुन्या पारपत्रात नमुद करण्यात आली होती. पण आखाती देशांतील वयोमर्यादेनुसार त्याने नवीन पारपत्र बनवले. या नवीन पारपत्रामध्ये त्यांनी जन्म वर्ष १९८४ दाखवले, म्हणजेच त्यांनी स्वतःचे वय १७ वर्षांनी कमी दाखवले. तसेच, इमाम हुसेन याने जुने पारपत्र मिळवताना १९६६ साली जन्म झाल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते, पण नवीन पारपत्रांमध्ये जन्मवर्ष १९७६ असे नमूद केले होते. दोघांनी हे कबूल केले आहे की गल्फ देशांमध्ये वयोमर्यादा असल्यामुळे त्यांनी नोकरी मिळवण्यासाठी बनावट जन्म दाखला सादर केला. त्यात स्वतःचे वय कमी दाखवले. त्याद्वारे दोघांनीही नवीन पारपत्रे तयार केली, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, याप्रकरणी आरोपींना कोणी मदत केली, याबाबत सहार पोलीस तपास करीत आहेत.