मुंबई : गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टतेला प्राधान्य देत मुंबई विद्यापीठाचा २०२४- २५ या आर्थिक वर्षाचा ८५७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शनिवारी कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अधिसभेत मंजूर करण्यात आला. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये १२१ कोटी ६० लाख रुपयांची तूट दाखविण्यात आली आहे. मात्र संशोधन आणि नाविन्यपूर्ण संस्कृतीचे बळकटीकरण, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण आणि वैश्विक नागरिकत्व शिक्षणासाठी पुढाकार, विद्यापीठ- औद्योगिक साहचर्य उपक्रमांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाचा २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाचा ८५७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रभारी वित्त व लेखा अधिकारी प्रा. रवींद्र बांबर्डेकर, यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य. डॉ. अजय भामरे, प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड, यांच्या उपस्थितीत अधिसभेच्या सदस्यांसमोर सादर केला. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, प्रा. बाळ आपटे दालन आणि सभागृह, स्कूल ऑफ लँग्वेजेस इमारत दुसरा टप्पा, अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्र, मुलींचे वसतिगृह, वेंगुर्ले उपपरिसराचा विकास आणि तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवासी संकुल व सामुदायिक सभागृह अशा विकासकामांना प्राधान्य देत १२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संशोधन आणि नाविन्यपूर्ण संस्कृतीच्या बळकटीकरणावर भर देत संशोधन विकास कक्ष, केंद्रीय संशोधन, उपकरणे आणि डिजिटलायझेशन सुविधा, मोबाइल टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन प्रात्यक्षिक व्हॅन, सेमीकंडक्टर्स, प्रगत साहित्य आणि नॅनोटेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अनुवांशिक अभियांत्रिकी, सायबर सुरक्षा, महासागर संशोधन, शाश्वत शेती, विषाणूशास्त्र, हवामान अनुकूलता विकास, संशोधनाला प्रोत्साहन, आरोग्य सेवा, स्मार्ट शहरे यावरील संशोधनासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थी सहाय्य आणि प्रगती उपक्रमांसाठी ५ कोटी रुपयांची, तसेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी सुविधा, युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू सेल, सुवर्ण पदके आणि मेरिट अवॉर्ड्स / स्कॉलरशिपमध्ये वाढ आदी योजनांचा यामध्ये समावेश आहे. माजी विद्यार्थी कनेक्ट आणि विद्यापीठ-औद्योगिक साहचर्य उपक्रमासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

हेही वाचा : मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध महाविद्यालयात पियुष गोयल यांच्या मुलाच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती, ओळखपत्र जप्त करून…

शासन गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टतेला प्राधान्य देण्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विकसित भारत २०४७ च्या अनुषंगाने विद्यापीठाचा पुढाकार, अमृतकाळाच्या पूर्वसंध्येला नाविन्यपूर्ण कार्यक्रम, जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठाचा मास्टर प्लॅन, कार्बन न्यूट्रल ग्रीन कॅम्पस उपक्रम, फोर्ट, विद्यानगरी आणि इतर उपपरिसरांतील पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण, व्हिसी फेलो, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी कल्याणकारी उपक्रम, महिला कल्याण योजना, क्रीडा सुविधेचे ऑलिम्पिक मानकांमध्ये सुधारणा, आरोग्य केंद्राचे अद्ययावतीकरण, डिजिटल लायब्ररी, रेकॉर्ड, हस्तलिखितांचे डिजिटायझेशन, व्ही.सी. फेलो, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, समुदाय सहभाग, रक्तदान अशा अनुषंगिक बाबींचा समावेश असलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प अधिसभेने मंजूर केला.

हेही वाचा : औषधांच्या तुटवड्यासंदर्भात क्षयरुग्णांचे पंतप्रधानांना पत्र

नाविन्यपूर्ण योजना

  • गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टता शैक्षणिक उपक्रम – १० कोटी
  • संशोधन आणि नाविन्यपूर्ण संस्कृतीच्या बळकटीकरणासाठी पुढाकार – १५ कोटी
  • विद्यार्थी सहाय्य आणि प्रगती उपक्रम – ५ कोटी
  • माजी विद्यार्थी कनेक्ट आणि विद्यापीठ, औद्योगिक साहचर्य उपक्रम – २ कोटी
  • उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण आणि वैश्विक नागरिकत्व शिक्षणासाठी पुढाकार – ३ कोटी
  • गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टता गव्हर्नंस उपक्रम – ३० कोटी

हेही वाचा : औषध प्रतिरोध क्षयरोग नियंत्रणात, क्षय बरा होण्याचा दर २०२३ मध्ये ८२ टक्के

नियोजित बांधकामे

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र – २५ कोटी
  • तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवासी संकूल व सामुदायिक सभागृह – २२ कोटी
  • प्रा. बाळ आपटे दालन – २८ कोटी
  • स्कूल ऑफ लॅंग्वेजेस इमारत (२ रा टप्पा), अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्र – १४ कोटी
  • आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (२ रा टप्पा) – २५ कोटी
  • मुलींचे वसतिगृह – ८ कोटी ५ लाख
  • वेंगुर्ला उपपरिसराचा विकास रुपये – ५० लाख