मुंबई : विविध शैक्षणिक आणि संशोधन उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने मुंबई विद्यापीठ आणि रशियामधील मॉस्को राज्य विद्यापीठ यांच्यातील कराराअंतर्गत इनोप्राक्तिका मॉस्को राज्य विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाला दिलेल्या निधीतून विद्यापीठात उच्च दर्जाचे ‘ई-कंटेंट’ स्टुडिओ आणि सभागृह तयार करण्यात आले आहे. दर्जेदार शैक्षणिक सामग्रीच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या दोन्ही सुविधा मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील शंकरराव चव्हाण शिक्षक प्रशिक्षण अकादमी इमारतीत कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

रशियातील मॉस्को येथील आर्ट-पॉडगोटोव्हका या स्वायत्त बिगर व्यावसायिक संस्थेने सदर सुविधेच्या निर्मितीसाठी ३० लाख रुपयांचे अनुदान विद्यापीठास दिले आहे. ई-कंटेंट स्टुडिओच्या मदतीने शिक्षक प्रशिक्षणामध्ये आमूलाग्र बदल घडविणे आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आशय वृद्धीसाठी मोठा फायदा होणार आहे.

प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा ‘ई-कंटेंट’ स्टुडिओच्या माध्यमातून उच्च गुणवत्तेच्या डिजिटल शैक्षणिक संसाधनांची निर्मिती करता येणार आहे. यामध्ये व्यावसायिक दर्जाची चित्रफीत तयार करण्यासाठी उच्च गुणवत्तायुक्त दृक-श्राव्य उपकरणे, ई-सामग्री संपादन व निर्मितीसाठी प्रगत सॉफ्टवेअर व हार्डवेअर, टेलिप्रॉम्प्टर व क्रोमा की, व्याख्यान ध्वनिमुद्रण व थेट प्रसारण आणि ई-सामग्री संचयन व व्यवस्थापनाच्या सुविधांचा समावेश आहे. तसेच अद्ययावत सुविधांनी सुस्सज असे सभागृहही कार्यान्वित करण्यात आले आहे.

या सुविधेचे उद्घाटन विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) सचिव प्रा. मनिष जोशी (आभासी पद्धतीने), रशियाचे वाणिज्य दूत इवान फेटिसोव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, रशियन हाऊसच्या डॉ. एलेना रेमीझोवा, विक्टर गोरेलीख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील आणि युरेशिअन स्टडीजचे प्रा. संजय देशपांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ई-कंटेंट’ स्टुडिओ आणि सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. मनिष जोशी यांनी मुंबई विद्यापीठाने ई-लर्निंग, ऑनलाईन अभ्यासक्रम, मूक्स आणि स्वयंमसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन केले. तर इवान फेटिसोव यांनी मुंबई विद्यापीठ आणि मॉस्को राज्य विद्यापीठाचे हे सहकार्य उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात शैक्षणिक उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी सहाय्यभूत ठरणार असल्याचे सांगितले. तर मुंबई विद्यापीठासोबतची भागीदारी ही विविध शैक्षणिक आणि संशोधन उपक्रमांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे डॉ. एलेना रेमीझोवा यांनी सांगितले.