मुंबई : शहरातील सार्वजनिक रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेने रक्तपेढ्यांना रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार रक्तपेढ्यांनी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संघटनांना रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. रक्तपेढ्यांच्या आवाहनाला मुंबई विद्यापीठाने साद देत मुंबईतील विविध १८ रेल्वे स्थानकांत रक्तदान शिबिरांचे आयोजन करून सुमारे १ हजार १९५ पिशव्या रक्तसंकलन केले. हे रक्तसंकलन सार्वजनिक रुग्णालयातील रक्तपेढ्यांमार्फत करण्यात आले.

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कक्षाच्या वतीने मुंबईतील विविध १८ रेल्वे स्थानकांत ऑक्टोबरमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील विविध संलग्नित महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी यांनी यासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे परीक्षेच्या कालावधीतही या स्वयंसेवकांनी पुढे येऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. त्यानुसार राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने ऑक्टोबरमध्ये डोंबिवली, अंधेरी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, ठाणे, घाटकोपर, चर्चगेट, वाशी, नेरुळ, भांडूप, मालाड, बेलापूर आणि पनवेल या रेल्वे स्थानकांवर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून १ हजार १९५ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने सक्रियपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्याची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर वेळोवेळी दखल घेतली असून या सेवाभावी कार्याचा सन्मान करण्यात आला आहे.

ही महाविद्यालये सहभागी झाली होती

एसआयए महाविद्यालय, द्वारकादास संघवी महाविद्यालय, के. जे. सोमय्या महाविद्यालय, व्हिएसआयटी महाविद्यालय, वसंतदादा पाटील महाविद्यालय, अण्णा लीला महाविद्यालय, जोशी बेडेकर महाविद्यालय, हिंदूजा महाविद्यालय, गुरुनानक महाविद्यालय, स्टर्लिंग महाविद्यालय, एमसीसी महाविद्यालय, निर्मला कॉलेज ऑफ कॉमर्स, डॉ. भानूबेन नानावटी फार्मसी महाविद्यालय, एसआयएस नेरुळ महाविद्यालय आणि पिल्लई महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.