मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) कौशल्याधारित उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनाला अनुसरून मुंबई विद्यापीठ आणि भारत सरकारअंतर्गतच्या शिक्षण मंत्रालयाच्या कौशल्य प्रशिक्षण मंडळ – पश्चिम विभाग यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण कराराच्या अनुषंगाने उद्योग आणि शिक्षण संस्थांमधील सहकार्य अधिक बळकट करून विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी एकात्मिक पदवी कार्यक्रमाअंतर्गत (अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॅम – एइडीपी) पदवी शिक्षणासोबतच प्रत्यक्ष उद्योगाधारित अनुभव आणि कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.

मुंबई विद्यापीठ आणि कौशल्य प्रशिक्षण मंडळ – पश्चिम विभाग यांच्यातील सामंजस्य कराराच्या अनुषंगाने पारंपरिक शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये उद्योगाधारित प्रशिक्षणाचा समावेश करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन यांसारख्या पारंपरिक क्षेत्रांबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), विदाशास्त्र (डेटा सायन्स), मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा, फिनटेक आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्येही विशेष अभ्यासक्रम व प्रशिक्षण सुरू करण्यात येणार असून यामुळे विद्यार्थी भविष्यातील उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याप्रसंगी कौशल्य प्रशिक्षण मंडळ – पश्चिम विभागचे क्षेत्रीय संचालक पी. एन. जुमले आणि सहाय्यक संचालक एन. सी. गांगडे यांच्यासह मुंबई विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.