मुंबई : मुंबई विद्यापीठाअंतर्गत प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठीची चौथी प्रवेश यादी बुधवार, ११ जून रोजी संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. मात्र प्रवेश क्षमतेनुसार सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे अनेक महाविद्यालयांकडून संबंधित अभ्यासक्रमांसाठीची चौथी प्रवेश यादी जाहीर करण्यात आली नाही. तसेच अनेक महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी मर्यादित जागांवर अधिक प्रवेश अर्ज आले होते. परिणामी, तिसऱ्या प्रवेश यादीच्या तुलनेत चौथ्या प्रवेश यादीअंतर्गत पारंपरिक अभ्यासक्रमांसह स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये ५ ते १० टक्क्यांहून अधिक वाढ झालेली पाहायला मिळाली. तर काही महाविद्यालयांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये चढ – उतार पाहायला मिळाले.
अनेक महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया जवळपास पूर्ण होऊन मोजक्याच जागा शिल्लक आहेत, त्यामुळे आता पाचव्या प्रवेश यादीअंतर्गत नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चुरस रंगणार आहे. दरम्यान, चौथ्या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि हमीपत्र अर्जासह शुल्क भरून प्रवेश निश्चिती ११ ते १३ जून रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार आहे. त्यानंतर १४ जून रोजी दुपारी १२ वाजता पाचवी प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर पाचव्या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि हमीपत्र अर्जासह शुल्क भरून प्रवेश निश्चिती १४ ते १८ जून रोजी सायंकाळी ५ पर्यंत होणार आहे.
चौथी प्रवेश यादी : मुंबईतील काही महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण
हिंदुजा महाविद्यालय, चर्नी रोड : बी. कॉम. ७३.०० टक्के, बी. कॉम. अकाउंटिंग ॲण्ड फायनान्ससाठी ८५.६० टक्के, बँकिंग ॲण्ड इन्शुरन्ससाठी ७५.०० टक्के, फायनान्शिअल मार्केटसाठी ८५.६० टक्के, बी.ए. मल्टिमीडिया ॲण्ड मास कम्युनिकेशन वाणिज्य शाखा ७१.८३ टक्के, कला शाखा ७५.६७ टक्के व विज्ञान ७५.०० टक्के, बी.एस्सी. माहिती तंत्रज्ञान गणित विषयात १०० पैकी ३५ गुण
रुईया महाविद्यालय, माटुंगा : बी.ए. इंग्रजी माध्यम ८२.६७ टक्के, बी.ए. कम्युनिकेशन आणि मीडिया कला शाखा ८८.३३ टक्के, वाणिज्य शाखा ८५.५ टक्के, विज्ञान शाखा ७३.५ टक्के, बी.एस्स्सी. ४३.७५ टक्के, बी.एस्स्सी. – बायोऍनालिटिकल सायन्ससाठी ६७.०० टक्के, बी.एस्स्सी. – बायोकेमिस्ट्रीसाठी ६०.०० टक्के, बी.एस्स्सी. – बायोटेक्नॉलॉजीसाठी ९४.६ टक्के, बी.एस्स्सी. संगणकशास्त्र ८०.१७ टक्के, ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंटसाठी ४४.६७ टक्के
रुपारेल महाविद्यालय, माटुंगा रोड (पश्चिम) : ‘बी.ए.’ अभ्यासक्रमासाठी ९०.३३ टक्के, बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी ८८.३३ टक्के, बी.एस्स्सी – संगणकशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश पूर्ण, बी.एस्स्सी – माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी बारावीत गणित विषयात १०० पैकी ९१ गुण इतके प्रवेश पात्रता गुण आहेत. तर बी.एस्स्सी अभ्यासक्रमासाठी विषय गटानुसार सीपीएस, सीपीएम, पीएमएस, सीपीबी, सीपीझेड, सीबीझेड विषय गटासाठी पहिल्या प्रयत्नातील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी.
डहाणूकर महाविद्यालय, विलेपार्ले : बी.कॉम. अभ्यासक्रमासाठी ५०.०० टक्के, तर बी.कॉम. मॅनेजमेंट स्टडीज, बी.कॉम. अकाउंट ॲण्ड फायनान्स, बँकिग ॲण्ड इन्शुरन्स, फायनान्शिअल मार्केट, बी.एस्सी. माहिती तंत्रज्ञान, बी.एस्सी. विदाशास्त्र, बी.ए. मानसशास्त्र, बी.ए. कम्युनिकेशन आणि मीडिया आदी अभ्यासक्रमांसाठी डहाणूकर महाविद्यालयातील प्रशासकीय कार्यलयात संपर्क साधणे.
साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले : बी.ए. ३७.५ टक्के, बी.एस्सी. ४०.०० टक्के, बी.कॉम. ५०.०० टक्के, बी.एस्स्सी. माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी इयत्ता बारावीत गणित विषयात १०० पैकी ५९, बी. कॉम. क्रीडा व्यवस्थापन ४५ टक्के, बी.कॉम. मॅनेजमेंट स्टडीज अभ्यासक्रमासाठी वाणिज्य शाखा ७६.६७ टक्के, विज्ञान शाखा ४७.८३ टक्के, कला शाखा ७१.६७ टक्के व पदविका अभ्यासक्रमासाठी ६५.६७ टक्के, बी.कॉम. अकाउंटिंग ॲण्ड फायनान्स वाणिज्य शाखा ८२.६७ टक्के, विज्ञान शाखा ५३.०० टक्के व पदविका अभ्यासक्रमासाठी ६०.०० टक्के, बी.कॉम. लॉजिस्टिक ॲण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि बी.ए. मल्टिमीडिया ॲण्ड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश पूर्ण