मुंबई : मुंबईच्या विकासाच्या संदर्भात ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मुंबई @ २०४७’ या परिषदेत अनेक मान्यवरांकडून येत्या गुरुवारी विचार मांडण्यात येणार आहेत.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वेच्या कायापालटाबरोबरच आता मेट्रो रेल्वेसेवेचे जाळे, बुलेट ट्रेन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरासाठी अनेक विकास प्रकल्प शहरात साकारले जात आहेत. झोपडपट्टीवासीयांच्या स्वप्नातील हक्काच्या घरांचे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. आपल्या महामुंबईच्या विकासाचे संकल्प चित्र कसे असेल, याविषयी राजकीय नेतृत्व आणि शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांकडून परिषदेत विचारमंथन करण्यात येणार आहे.
मुंबईच्या भविष्यातील विकासावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मनोगत व्यक्त करतील. कौशल्य विकासाच्या संधीवर कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा हे विचार मांडणार आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी हे मुंबई व महानगरांचा विकास, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती हे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था, म्हाडाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव जयस्वाल हे मंबईतील घरबांधणी क्षेत्र व परवडणारी घरे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि चौथी मुंबई, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॅा. अभिजित बांगर हे आपत्ती व्यवस्थापन व नगरनियोजनाचे आव्हान याचा वेध घेतील.