लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गेले दोन महिने खालावलेली मुंबईतील हवेची गुणवत्ता आता काहिशी सुधारली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर अनेकदा काही भागांत वाईट ते अतिवाईट हवेची नोंद झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यायाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली. दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईतील हवेच्या दर्जेत सुधारणा झाल्याचे दिसते आहे.

मुंबईतील प्रदुषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिका सतत प्रयत्न करत आहे. दरम्यान, धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई शहरात उपकरणांसह अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. पालिकेकडून रस्ते, पदपथ पाण्याने धुण्यात येत असून फॉगर, अँटी स्मॉग यंत्रांचादेखील वापर करण्यात येत आहे. त्यामुळे धुळीचे प्रमाण कमी होऊन मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा होत आहे. यापूर्वी दरदिवशी ५०० ते ६०० किलोमीटरचे रस्ते धुतले जात होते. आता रोज त्यात एक हजार किलोमीटरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, हे काम पूर्ण करण्यासाठी पालिकेने पाण्याचे अतिरिक्त टॅंकर भाड्याने घेतले आहेत.

आणखी वाचा-मोनोरेलचे महा मुंबई मेट्रोमध्ये विलीनीकरण

पालिकेने २५ ऑक्टोबर २०२३ रोजी जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. या मार्गदर्शक तत्वांनुसार बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी चारही बाजूंनी हिरवे कापड लावणे, सतत पाणी शिंपडणे, बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने पूर्णपणे झाकणे तसेच उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी घालणे अशा सर्व उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. महापालिका आय़ुक्त डॉ. इक्बालसिंग चहल हे या संदर्भात वेळोवेळी आवश्यक ते आदेश देत आहेत. दरम्यान, आतापर्यंत या मार्गदर्शक तत्वांचे पालन न करणाऱ्या २,९९५ बांधकामांना नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच ६०३ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून ८६८ बांधकामे थांबविण्यात आली आहेत. ताडपत्री न लावलेल्या १०४ बांधकाम स्थळांवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख १० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अनधिकृत सी आणि डी डम्पिंगच्या २८४ प्रकरणांमध्ये १६ लाख २६ हजार रुपये दंड आकारण्यात आला आणि कचरा जाळण्याच्या ७० प्रकरणांमध्ये ३१ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

आणखी वाचा-२६/११ हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शीची घराची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन महिन्यांच्या तुलनेत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा

प्रदूषण मापनासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची १४ केंद्रे, भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था, पुणे यांची ९ केंद्रे तर पालिकेची ५ केंद्रे मुंबईत स्थापित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर १ नोव्हेंबर २०२३ रोजी हवेचा दर्जा खालावल्याचे दिसून आले होते. दरम्यान, आता वायू प्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपायांच्या अंमलबजावणीनंतर हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असून कुलाबा, कांदिवली, मुलुंड, शीव आणि वरळीतील हवा गुणवत्ता निर्देशांक जवळपास ५० टक्क्यांनी सुधारला आहे.