मुंबई : राज्यातील विदर्भ आणि कोकण या दोन विभागांना जोडणारी नागपूर-मडगाव विशेष रेल्वेगाडी ३० मार्चऐवजी ३० जूनपर्यंत धावणार आहे. दरम्यान, आठ जूनपर्यंत कोकण रेल्वेचे पावसाळयातील वेळापत्रक सुरू होईपर्यंत या रेल्वेगाडीची सेवा कायम राहील. त्यानंतर, ३० जूनपर्यंत या रेल्वेगाडीच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव आणि गाडी क्रमांक ०११४० मडगाव-नागपूर रेल्वेगाडीची सेवा वाढवण्यात येत आहे. प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली रेल्वेगाडी कायमस्वरूपी वेळापत्रकाद्वारे न चालवता, दर दोन ते तीन महिन्यांची सेवा वाढवून, ही रेल्वेगाडी कोकण आणि मध्य रेल्वेकडून विशेष तिकीटदरासह चालवण्यात येत आहे. कोकण आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या मागणीचे कारण देत, गेल्या दोन वर्षात अनेक वेळा या रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ करण्यात आली आहे. तसेच, ३० डिसेंबर २०२३ ते ३० मार्च २०२४ पर्यंत नागपूर-मडगाव आणि ३१ मार्च २०२४ पर्यंत मडगाव-नागपूर या रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा नागपूर-मडगाव रेल्वेगाडीची सेवा ८ जूनपर्यंत आणि मडगाव-नागपूर रेल्वेगाडीची सेवा ९ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, या रेल्वेगाडीला प्रवाशांचा प्रतिसाद असून ही रेल्वेगाडी नागपूर ते मडगाव या पट्ट्यातील अनेक महत्वाच्या ठिकाणांशी जोडते. मात्र रेल्वे प्रशासन या रेल्वेगाडीला कायमस्वरूपी वेळापत्रकानुसार का चालवत नाही, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा >>>आमचा प्रश्न.. उत्तर मुंबई : रेल्वेची जीवघेणी वाहतूक कधी सुधारणार, माजी रेल्वे मंत्र्यांच्या उमेदवारीमुळे समस्या सुटण्याची आशा

कोकण रेल्वेच्या पावसाळ्यातील वेळापत्रकानुसार

गाडी क्रमांक ०११३९ नागपूर – मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष नागपूर १२ जून ते २९ जूनपर्यंत दर बुधवार आणि शनिवारी दुपारी ३.०५ वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.४५ वाजता पोहचेल. गाडी क्रमांक ०११४० मडगाव- नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष १३ जून ते ३० जूनपर्यंत दर गुरुवार आणि रविवारी सायंकाळी ७ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ९.३० वाजता नागपूरला पोहोचेल. दोन्ही दिशेकडील रेल्वेगाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवि आणि करमळी येथे थांबेल.