मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पातील केवळ साडे चार किमीचा भाग वगळता नागपूर ते वैजापूर (४८८ किमी) महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे, असा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर ते सेलू बाजार आणि मालेगाव ते वैजापूर असा ४५९ किमीचा (पॅकेज पाचमधील सेलू बाजार ते मालेगावचा भाग वगळत) मार्ग कोणत्याही क्षणी सुरू करण्यासाठी आपण तयार असल्याचेही एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे. तरीही महामार्गाच्या लोकार्पणासाठीचा मुहूर्त काही निश्चित होताना दिसत नसल्यामुळे समृद्धीवरून प्रवास करण्याचे प्रवाशांचे स्वप्न लांबणार असल्याचे चित्र आहे.

मुंबई ते नागपूर ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गाचे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे काम संथगतीने सुरू राहिल्याने ऑगस्ट २०२२ उजाडले तरी ७०१ किमीच्या कामाच्या पूर्णत्वाची प्रतीक्षाच आहे. प्रकल्पाचा संपूर्ण टप्पा पूर्ण होण्यास बराच वेळ लागणार असल्याने एमएसआरडीसीने जसे काम होईल तसे टप्प्याटप्प्याने मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार नागपूर ते सेलू बाजार, वाशीम अशा २१० किमीचे काम पूर्ण झाल्याने हा टप्पा मार्च २०२२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार होता. मात्र हा मुहूर्त चुकला. पुढे २ मेचा मुहूर्त यासाठी निश्चित झाला, लोकार्पणाची सर्व तयारी पूर्ण झाली, मात्र लोकार्पणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना यातील निर्माणाधीन, अगदी अंतिम टप्प्यात काम असलेल्या उन्नत पुलाचा भाग कोसळला आणि लोकार्पण रखडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकार्पण रखडल्याबाबत एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांना विचारले असता त्यांनी २१० किमीचा नव्हे तर ४८८ किमीचा नागपूर ते वैजापूर मार्ग सुरू करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे सांगितले. मात्र या मार्गावरील साडे चार किमीचे काम अपूर्ण आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.