मुंबई : आमदारांच्या दौऱ्याच्या वेळी धुळे शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या १ कोटी ८४ लाख रुपयांच्या रोख रकमेमुळे विधिमंडळाची अंदाज समिती वादात सापडली होती. याच अंदाज समितीची राष्ट्रीय परिषद सोमवार व मंगळवार अशी दोन दिवस मुंबईतील विधान भवनात होत आहे.

गेल्या महिन्यात विधिमंडळाची अंदाज समिती धुळे दौऱ्यावर असताना समिती प्रमुख शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सचिवाच्या कक्षात १ कोटी ८४ लाख रुपयांची रोख रक्कम सापडली होती. ही रक्कम समिती प्रमुख व आमदारांना वाटण्यासाठी ठेकेदारांकडून जमा केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. गोटे व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांनी कक्ष उघडून त्याची तपासणी केली असता रोख रक्कम आढळली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त करीत विशेष चौकशी पथकाकडून चौकशीची घोषणा केली होती. विधान परिषद सभापती राम शिंदे व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही याप्रकरणी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. धुळे पोलिसांच्या कारवाईनंतर विधान भवनातील कक्ष अधिकाऱ्याला निलंबित केले होते. चौकशी सध्या सुरू असल्याचे विधिमंडळ सचिवालयाकडून सांगण्यात आले. त्यावर अधिक भाष्य करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.

रोख रक्कम सापडल्याने अंदाज समिती बदनाम झाली असतानाच संसद व विविध राज्यांमधील अंदाज समितीच्या प्रमुखांची परिषद सोमवार व मंगळवार अशी दोन दिवस मुंबईतील विधान भवनात होत आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री, उभय सभागृहांचे पीठासीन अधिकारी या वेळी उपस्थित असतील. अंदाज समितीच्या कामकाजाबाबत चर्चा होणार असताना जेथे ही परिषद होत आहे त्याच राज्यातील अंदाज समिती दौऱ्यात पैसे सापडल्याने बदनाम झाली आहे.

अंदाज समितीचे महत्त्व का ?

●संसद व विधिमंडळात लोकलेखा समितीनंतर अंदाज समितीचे महत्त्व असते. अर्थसंकल्पीय अंदाज आणि पूरक मागण्यांची छाननी करण्याचे काम अंदाज समितीचे असते. शासकीय खर्चाच्या अंदाजांची तपशीलवार छाननी करणे आणि खर्चावर नियंत्रण आणण्याकरिता उपाययोजना सुचविण्याचे या समितीचे काम असते. राज्यभर दौरे करून सरकारी योजनांची पाहणी समितीच्या सदस्यांकडून केली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● समित्यांच्या दौऱ्यांमध्ये पैसे वाटले जात असल्याची नेहमी चर्चा होत असे. पण अंदाज समिती सदस्यांच्या दौऱ्यात समिती प्रमुखांच्या सचिवाच्या कक्षात १ कोटी ८४ लाखांची रोख रक्कम सापडल्याने चिंता व्यक्त होत आहे.