Mumbai Emergency Ambulance Statistics मुंबई: आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी यासाठी आरोग्य विभागाने १ फेब्रुवारी २०१४ पासून राज्यात सुरू केलेली ‘१०८’ रुग्णवाहिका जीवनवाहिनी ठरत असून या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेमुळे गेल्या दहा वर्षात एक कोटी पेक्षा अधिक रुग्णांना जीव वाचण्यास मदत मिळाली आहे. यात प्रामुख्याने अपघातातील रुग्ण तसेच गर्भवती महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तब्बल ४१ हजार गर्भवती महिलांच्या बाळाचा जन्म रुग्णवाहिकेत झाला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान व आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने ‘१०८’ ही आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली असून पूर्णत: मोफत पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवेमुळे अपघातग्रस्त, बाळंतपणासाठी अडलेल्या महिला, विषबाधेसह इतर सर्वच प्रकारची वैद्यकीय मदत नागरिकांना वेळेत पोहचू शकत असल्याने अनेकांना नवजीवन देण्यास मदत झाली. १०८ क्रमांकावर कॉल केल्यास अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असलेली रुग्णवाहिका पेशंटच्या सेवेसाठी सुवर्ण काळात हजर होत आहे. रुग्णवाहिकेतील मशीनरीच्या साहाय्याने गोल्डन अवर्समध्ये पेशंटना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यापूर्वी आवश्यक प्राथमिक उपचार मिळतात. त्यामुळे घटना स्थळापासून हॉस्पिटलपर्यंत पेशंटना उपचार लाभत आहेत. ‘जीपीआरएस’ प्रणालीमुळे कॉल आल्यास संबंधित डॉक्टरांना कळवून रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण भागासाठी ६९० रुग्णवाहिका आणि मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व नागपूर, नाशिक या महानगरपालिकाच्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र शासनातर्फे अतिरिक्त २४७ रुग्णवाहिका अशा एकूण ९३७ रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या सेवेचा दळणवळणासाठी जिकिरीच्या ठरणाऱ्या व अतिदुर्गम भागांमधील नागरिकांसह तालुका आणि शहरी भागातील नागरिकांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध आहे. वैद्यकीय तातडीच्या वेळी १०८ क्रमांक डायल करून रुग्णवाहिकेची मदत घेता येते. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी या रुग्णवाहिका उपलब्ध असतात. या रुग्णवाहिका ३६५ दिवस आणि २४ तास कोणत्याही क्षणी उपलब्ध आहेत. या सेवेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये अपघातग्रस्तांसह गर्भवती महिलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. रुग्णालयात उपचार करण्यासाठी आवश्यक अशी गरज असलेल्यांसाठी तब्बल १२ प्रकारच्या सेवा १०८ रुग्णवाहिकेत असतात.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आपत्कालिन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत, गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना सुसज्ज रुग्णवाहिकेत प्राथमिक उपचार करून रुग्णासनजीकच्या रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी भरती करण्याबाबतची ही योजना आहे. यामध्ये रस्त्यावरील अपघात, सर्व गंभीर स्वरुपाचे आजाराचे रुग्ण, बाळंतपणातील गुंतागुंतीचे रुग्ण, नवजात अर्भकाशी संबंधीत आजार, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत सापडलेले रुग्ण, गंभीर आजारामध्ये हदय रुग्ण, सर्पदंश, अपघात, विषबाधा, श्वासोच्छवासाचे गंभीर आजार, मेंदूशी संबंधित गंभीर आजार इत्यादींचा समावेश असतो. ही सेवा टोल फ्री क्रमांक ‘108’ मार्फत कुठल्याही मोबाईल/लँडलाईन फोनद्वारे उपलब्ध करुन घेता येते. तसेच ही सेवा संपुर्णपणे मोफत उपलब्ध करुन दिली जाते. रुग्णास प्राथमिक उपचार देण्यासाठी एक प्रशिक्षित डॉक्टर व एक ड्रायव्हर रुग्णवाहिकेमध्ये चोवीस तास उपलब्ध असतात.
आकडेवारीचा विचार करायचा झाल्यास गेल्या दहा वर्षांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवा या योजनेंतर्गत विविध प्रकारच्या आणीबाणीच्या परिस्थितीत १,०९,१४,०५५ लोकांना हीआरोग्य सेवा देण्यात आहेत. यात वाहन अपघातात जखमी झालेल्या ५,३६,८५६ रुग्णांना मदत मिळाली तसेच हल्ला झाल्या प्रकरणात ९१,११४, भाजलेल्यांमध्ये ३०,८३६ रुग्ण, ह्रदयविकाराचा झटका आलेल्या ९१,५७० रुग्णांना तात्काळ रुग्णालयात पोहोचविण्यात आले. उंचावरून पडलेल्या १,५९,४५९ जणांना तर नशा अथवा विषबाधा झालेल्या २,५२,२९८ जणांना मदत मिळाली आहे. प्रसूती /बाळंतपणासाठी १७,३९,२२१ महिलांना वेळीच रुग्णालयात या रुग्णवाहिकेमधून पोहोचविण्यात आले आहे. याशिवाय वैद्यकीय मदतीसाठी ६७,०३,९२० रुग्णांना या सेवेचा लाभ घेतला तसेच ट्रॉमा, आत्महत्या आदी विविध प्रकरणांमध्ये या रुग्णवाहिका सेवेची मोलाची मदत झाली असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.याशिवाय रुग्णवाहिकेत ४,२१८ रुग्णां व्हेंटिलेटर , डिफिब्रिलेशन १५६ रुग्ण तसेच तब्बल ४१,०३३ गर्भवती महिलांनी आपल्या बाळांना रुग्णवाहिकेत जन्म दिला आहे..
या सेवेचे सनियंत्रण औंध उरो रुग्णालय, पुणे येथिल मध्यवर्ती नियंत्रण कक्षामधील कर्मचा-यांमार्फत केले जाते. यामध्ये कॉल घेणारे आणि डॉक्टर्स (समुपदेशक) यांचा प्रामुख्याने सहभाग असतो. या प्रकल्पांतर्गतआपद्ग्रस्तांना पहिल्या सुवर्ण तासामध्ये (गोल्डन अवर्स) तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिली जाते. तातडीने सेवा पुरविण्यासाठी सर्व रुग्णवाहींकामध्ये अत्याधुनिक कॉम्पुटर टेक्नोलॉजी इंटिग्रेशन, व्हॉईस लॉगर सिस्टम, जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली), जीपीएस (भौगोलिक स्थिती प्रणाली) एव्हीएलटी (ऑटोमॅटिक व्हेईकल लोकेशन सिस्टम) आणि मोबाइल कम्युनिकेशन सिस्टम (एमसीएस) इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत दोन प्रकारच्या रुग्णवाहिका अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट (एएलएस) आणि बेसिक लाईफ सपोर्ट (बीएलएस) पुरविण्यात आलेल्या आहेत. दोन्ही प्रकारच्या रुग्णवाहिकांमध्ये (अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट आणि बेसिक लाईफ सपोर्ट) अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे बसविण्यात आलेले असून प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व प्रशिक्षित वाहनचालकांमार्फत सेवा पुरविण्यात येते असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.