जातीच्या मुद्द्यावरुन एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरूच आहे. गेले काही दिवस ते थंडावलं असलं तरी आता पुन्हा एकदा हा मुद्दा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त समीर वानखेडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर हजेरी लावली. मात्र भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यांना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका सेनेकडून करण्यात आली आहे. तर नवाब मलिक यांनीसुद्धा वानखेडेंच्या या भेटीवर टीकास्त्र सोडलं आहे.

या भेटीबद्दल तसंच वानखेडे यांच्यावर घेण्यात आलेल्या या आक्षेपाबद्दल बोलताना नवाब मलिक म्हणाले, “बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. अभिवादन करणारा फक्त ठराविक समाजाचा, जातीचाच असायला हवा, असा समज असेल तर तो चुकीचा आहे. मला वाटतं आम्ही दरवर्षी इथं येतोय. पण काही लोकांनी या वर्षीपासून यायला सुरूवात केली आहे. ते छान आहे. आता जय भीम नावाचा एक पिक्चर आला आहे. त्या सिनेमात जय भीम हे घोषवाक्य नाही. हा सिनेमा तळागाळातल्या समाजाचा संघर्ष दाखवणारा आहे. त्याप्रमाणेच जो संघर्ष मी सुरू केलेला आहे, त्याचा जय भीम इम्पॅक्ट आता सुरू झाला आहे. त्यामुळे लोक अभिवादन करायला यायला लागले आहे”.

हेही वाचा – समीर वानखेडेंकडून चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन; बाहेर पडताना झालेल्या घोषणांमुळे वाद

या आधी कधी समीर वानखेडे बाबासाहेबांना अभिवादन करायला आले होते का, असा प्रश्न विचारला असता मलिकांनी खोचक शब्दांत वानखेडेंना टोला लगावला. ते म्हणाले, “बाबासाहेबांना अभिवादन करायला येत होते की नाही हे माहित नाही. पण माझ्यासोबत नमाज पढायला मात्र नक्कीच येत होते”.