गेल्या महिन्याभरापासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून राज्यातलं आणि विशेषत: मुंबईतलं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. समीर वानखेडेंनी कॉर्टेलिया क्रूजवर छापा टाकून आर्यन खानसह ८ आरोपींना अटक केली. पण तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सातत्याने समीर वानखेडे आणि एनसीबीवर टीका केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा या प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. मात्र, आपल्याला या तपासातून हटवलं नसल्याचा दावा समीर वानखेडेंकडून करण्यात आल्यानंतर त्यावर आता नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे.

“ही तर फक्त सुरुवात आहे”

समीर वानखेडेंकडून हा तपास काढून घेतल्याचं ट्वीट शुक्रवारी संध्याकाळी नवाब मलिक यांनी केलं होतं. यामध्ये “समीर वानखेडेंना आर्यन खानच्या प्रकरणासोबतच एकूण ५ प्रकरणांच्या तपासातून हटवण्यात आलं आहे. अशी एकूण २६ प्रकरणं आहेत ज्यांचा तपास होणं आवश्यक आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. व्यवस्था स्वच्छ करण्यासाठी खूप काही करण्याची गरज आहे. आणि आम्ही ते करू”, असं त्यांनी म्हटलं होतं.

समीर वानखेडेंचा दावा…

मात्र, या सगळ्या गोंधळानंतर समीर वानखेडेंनी एएनआयला प्रतिक्रिया देताना आपल्याला या प्रकरणाच्या तपासातून काढलेलं नसल्याचा दावा केला. “मला तपासातून काढण्यात आलेलं नाही. मीच न्यायालयात याचिका दाखल केली होती की या प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून व्हावा. त्यामुळे आर्यन खान आणि समीर खान प्रकर दिल्ली एनसीबीच्या एसआयटीमार्फत हाताळलं जात आहे. दिल्ली आणि मुंबई एनसीबीमधलं हे परस्पर सहकार्य आहे”, असं समीर वानखेडे म्हणाले.

मलिक म्हणतात, देशाला सत्य समजायला हवं

मात्र, यानंतर नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. “समीर वानखेडे देशाला भरकटवत आहेत. त्यांची सुरू असलेली चौकशी मुंबई पोलिसांकडून न करता सीबीआय किंवा एनआयएकडून व्हावी, यासाठी त्यांनी याचिका दाखल केली होती. आणि न्यायालयाने ती याचिका फेटाळली आहे. देशाला सत्य समजायला हवं”, असं ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे.

मोठी बातमी! समीर वानखेडेंकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढला! नवाब मलिक म्हणतात, “ही तर फक्त…!”

दोन एसआयटी स्थापन

त्यापाठोपाठ आज सकाळी त्यांनी ट्वीट करून आपणच समीर वानखेडेंच्या एसआयटी चौकशीची मागणी केल्याचं सांगितलं. “आर्यन खानचं अपहरण आणि त्याच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी समीर दाऊद वानखेडेंची एसआयटी चौकशी केली जावी अशी मागणी मी केली होती. आता केंद्र आणि राज्य अशा दोन एसआयटी स्थापन झाल्या आहेत. पाहुयात, यापैकी कोण समीर वानखेडे आणि त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचं सत्य जगासमोर आणतं ते”, असं ट्वीट नवाब मलिक यांनी केलं आहे.

आता या प्रकरणात नेमका समीर वानखेडेंकडून तपास काढून घेण्यात आला की प्रशासकीय निर्णय म्हणून तपास हस्तांतरीत करण्यात आला, यावरून दावे-प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत.