अनाठायी राजकीय दौऱ्यांवर शरद पवारांच्या कानपिचक्या

मुंबई : पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे फक्त भाजप आमदार आशीष शेलार यांना बरोबर घेऊन गेल्याने त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका करण्यात आली. पूरग्रस्त भागात आपत्ती पर्यटन होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोश्यारी यांच्या दौऱ्यामुळे केंद्राकडून राज्याला अधिक मदत मिळण्यात मदतच होईल, असा टोला लगावला. तर राष्ट्रपतींच्या सूचनेनुसारच राज्यपालांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राज्यात एखादी आपत्ती आल्यानंतर त्या भागात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांचे दौरे लोकांना धीर देण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी दौरे करणे आवश्यक आहे. मात्र आता इतरांनी दौरे करून मदत-बचाव कार्यात गुंतलेल्या यंत्रणेवर ताण आणू नये, असे आवाहन करीत पूरग्रस्त भागात आपत्ती पर्यटन होऊ नये, अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना दिल्या आहेत.

पवार यांनी लातूरच्या भूकंपानंतरच्या घटनेचे उदाहरण दिले. लातूर भूकंपानंतर तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना लातूरचा दौरा करायचा होता. मात्र मी त्यांना दहा दिवस न येण्याची विनंती केली. तुम्ही आलात तर सर्व यंत्रणा तुमच्यासाठी कामाला लागेल, असे सांगितले. माझे म्हणणे पंतप्रधानांना पटले, अशी आठवण सांगितली. राज्यावर अशा प्रकारचे संकट आल्यानंतर मी दौऱ्यावर जात असतो. मात्र यावेळी  दौऱ्यावर जाणे मुद्दाम टाळले आहे, असे पवार यांनी सांगितले.

भाजप आमदारच बरोबर कसे?

राज्यपाल हे कोणत्या पक्षाचे नसतात. परंतु राज्यपाल कोश्यारी यांनी राजभवनाचे भाजपच्या कार्यालयात रूपांतर के ल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी के ली. राज्यपालांच्या दौऱ्यात फक्त भाजपचे आमदार शेलार एकटेच कसे होते, असा सवालही त्यांनी के ला.

आपत्तीग्रस्त भागातील प्रशासकीय यंत्रणा ही मदत व बचाव कार्यात व नंतर लगेच पुनर्वसनाच्या कामात गुंतलेली असते. या भागात जाऊन यंत्रणेवर ताण आणणे योग्य नव्हे.

शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा कोकणातील पूरग्रस्त भागाचा दौरा राष्ट्रपतींच्या सूचनेवरून करण्यात येत आहे. देशाच्या राज्यघटनेनुसार राज्यपाल हे राज्याचे प्रशासकीय प्रमुख असतात आणि मुख्यमंत्री व मंत्री त्यांना सल्ला देतात. त्यामुळे त्यांनी दौरा करणे गैर नाही.

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते