सत्तेत एकत्र असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीमध्ये नेहमीच कटुतेचे संबंध राहिले होते. या पाश्र्वभूमीवर आघाडी सरकारच्या काळात भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या कंपनीला ठाणे जिल्ह्य़ातील ‘पलावा’ प्रकल्पाला देण्यात आलेल्या परवानगीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्याची मागणी करून, राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराजबाबांबद्दल संशयाचे वातावरण तयार करीत जुने उट्टे काढले आहे.
डोंबिवलीजवळील ‘पलावा’ प्रकल्पाला परवानगी देताना नियमांचे उल्लंघन झाले होते. लोढा यांच्या कंपनीला काही हजार कोटींचा फायदा होईल अशा पद्धतीने चटईक्षेत्र निर्देशांक बहाल करण्यात आला होता. या परवानगीत गैर आढळल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारच्या काळातील परवानगीला स्थगिती दिली असल्याने त्यात नक्कीच काही तरी काळेबेरे असणार. यामुळेच या साऱ्या परवानगीची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. ही परवानगी कोणी दिली हे समोर आले पाहिजे. या सर्व गैरव्यवहाराची चौकशी निश्चित झाली पाहिजे, असेही मलिक यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदाच्या काळात पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीला विविध प्रकरणांमध्ये अडचणीत आणले होते. आता संधी मिळताच राष्ट्रवादीने चव्हाण यांच्यावर सारे उलटविण्याचा प्रयत्न केला आहे.
‘ठेकेदार, भाजप पदाधिकाऱ्यांचेच भले’
सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार प्रकल्पाकरिता कोटय़वधी रुपयांची बोगस बिले लाटण्याचे प्रकार सुरू झाल्याचा आरोप मलिक यांनी केला. काही ठेकेदारांचे या कामांमध्ये भले झाले आहे. जलयुक्त शिवाराची ९० हजार कामे सुरू असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मग ही कामे कुठे सुरू आहेत, त्यात लोकसहभाग किती होता, श्रमदानातून किती काम झाले याची सारी माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी मलिक यांनी केली. सत्ताधारी भाजपशी संबंधित ठेकेदार आणि पक्षाचे पदाधिकारी ठिकठिकाणी हात धुऊन घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.



