भिडे गुरूजी तुमचे शिष्य हल्लेखोर कसे? विचारत जितेंद्र आव्हाडांचा ट्विट

अविनाश पवार ह्यांनी मला ठार मारण्याची तयारी केली होती, घरापर्यंत येऊन गेला होता असे कसे तुमचे शिष्य असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावर टीका करणारा एक ट्विट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. एक फोटो ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडे गुरुजींवर निशाणा साधला आहे. या फोटोमध्ये भिडे गुरुजींसोबत अविनाश पवार दिसतो आहे. हा फोटो ट्विट करत गुरूजी असे कसे हो तुमचे शिष्य? अविनाश पवार ह्यांनी मला ठार मारण्याची तयारी केली होती, अगदी घरापर्यंत येऊन गेलो हात. सांगलीत तुमच्या शिष्याने जीवघेणा हल्ला केला हीच का तुमची शिकवण? असा प्रश्न विचारत आव्हाड यांनी टीका केली आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण घडले तेव्हाही जितेंद्र आव्हाड यांनी मीरज दंगलीतला भिडे गुरुजींचा फोटो ट्विट करत हा फोटो कोणाचा? असा प्रश्न उपस्थित केला होता. मीरजच्या दंगलीत संभाजी भिडे यांना त्यांचे समर्थक पोलिसांपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा हा फोटो आहे. त्यावेळीही जितेंद्र आव्हाड यांनी फोटो ट्विट करत अशाच प्रकारे टीका केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा तशीच टीका केली आहे.

एटीएसने अटक केलेल्या हिंदू कट्टरपंथीयांच्या हिटलिस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांचेही नाव होते अशी माहिती एटीएसने कोर्टात दिली. त्याच पार्श्वभूमीवर हा फोटो ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी संभाजी भिडेंवर निशाणा साधला आहे. शनिवारी सकाळीच जितेंद्र आव्हाड यांनी माझ्या घराची रेकी करण्यात आली होती व त्यासंदर्भात आपण पोलिसातही गेलो होतो असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे मनुवादी हे तालिबानी संघटनासारखेच आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ncp leader jitendra awhad tweets against sambhaji bhide and avinash pawar