मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल, असा अंदाज अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीने लढविली असती तर त्यांना जितके यश मिळाले असते, त्यापेक्षा जास्त यश ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणूक लढविल्यामुळे येणार आहे, असा अंदाज भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. महायुतीतील एका मातब्बर मंत्र्यांनी असा अंदाज व्यक्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

गत अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येण्याविषयीची चर्चा सुरू आहे. हिंदी सक्ती विरोधातील आंदोलनाच्या यशानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे. त्यात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हिंदी सक्तीच्या वादात उडी घेऊन वादग्रस्त विधानांची मालिका सुरू केल्यामुळे महापालिका निवडणुकीच्या चर्चेने जोर धरला आहे.

२० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठी अस्मितेचा आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंमध्ये जवळीक निर्माण झाली आहे. मराठी भाषेसाठी मनसेने घेतलेली भूमिका प्रत्येक मराठी बांधवांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. पण, हे करताना कोणाचाही द्वेष करण्याची गरज नाही. कुणाला विनाकारण मारू नका, आधी समजावून सांगा. मराठी शिकायला बोलायला तयार असेल तर शिकवा. उर्मट बोलत नसेल तर वाद घालू नका. पण उर्मट बोलला, तर मग पुढे तशी भूमिका घ्या, असे म्हणत राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे.