मुंबईः विधान भवनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला हाणामारीनंतर मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशीरा नितीन देशमुख व ऋषीकेश टकले यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी रात्रीच दोघांचीही वैद्यकीय तपासणी केली. यापूर्वी दोघांविरोधात गुन्हे दाखल आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार (शरद पवार) जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी विधान भवनामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीवरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच पोलिसांनीही याप्रकरणी कारवाई केली. याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली.

देखमुख यांच्या अटकेला आव्हाडांनी विरोध केला. यावेळी तासभर आव्हाड व त्यांचे कार्यकर्ते पोलिसांच्या गाडीसमोर बसून होते. कार्यकर्त्याला नेऊ देणार नाही, असा पवित्रा आव्हाड यांनी घेतला होता. एकीकडे पोलिसांनी नितीन देशमुख यांना बसवलेल्या मोटरगाडी समोर आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते आंदोलन करीत असतानाच अचानक त्याला दुसऱ्या मोटरगाडीमध्ये बसवण्यात आले. या गोंधळादरम्यान आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते दुसऱ्या मोटरगाडी समोर आंदोलन करण्यासाठी उठले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या गाडीच्या पुढील बाजूस आव्हाड यांनी स्वत:ला झोकून दिले. पोलिसांची मोटरगाडी इंचभरही हलू देणार नाही अशी भूमिका घेत आव्हाड थेट मोटरगाडीच्या खाली शिरले. पण पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना उचलून तेथून बाजूला केले. त्यानंतर पोलिसांची मोटरगाडी तेथून निघून गेली.

आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवारी विधान भवनामध्ये हाणामारी झाली. या हाणामारीवरून राजकीय वातावरण तापले असताना आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यावरूनही नाट्य रंगले. माझा कार्यकर्ता नितीन देशमुख यांना विधान भवनात मारहाण करण्यात आली. मारहाण करणारे पळून गेले आणि मार खाणाऱ्या कार्यकर्त्यालाच पोलिसांनी पकडले. सत्ताधाऱ्यांना इतके शरण गेलेले प्रशासन मी पाहिले नाही, असा आरोप आव्हाड यांनी समाज माध्यमांवर केला आहे.