राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गट आणि अजित पवार यांचा गट समोरासमोर आलेला पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांकडून आता जोरदार टीकेची झोड उठवली जात आहे. बुधवारी (५ जुलै) मुंबईत दोन्ही गटांकडून बैठका घेत शक्तीप्रदर्शन होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.

सक्षणा सलगर म्हणाल्या, “शरद पवारांच्या समर्थनासाठी वयोवृद्ध महिला व तरुणी इथं उपस्थित आहेत. या महाराष्ट्राचा राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक प्राण शरद पवार आहेत. ते सत्तेत गेलेत आपल्याला काही तरी संधी मिळू शकते हे मलाही कळतं. मात्र,युद्धाच्या काळात जेव्हा लढलं जातं तेव्हा इतिहासात नोंद होते. आम्ही शरद पवारांसाठी लढलो ही आमची नोंद होईल.”

“खरे प्रामाणिक आम्ही कार्यकर्ते आहोत”

“आम्ही आमदार नाही, खासदार नाही. या १८ पकड जातीच्या महिला-युवती आहेत. खरे निष्ठावंत हे सामान्य घरातील लोक असतात हे देशाला कळू द्या. हे आमदार नाहीत, खासदार नाहीत की कुटुंबातील नाहीत. या निमित्ताने मला एक संदेश द्यायचा आहे की, खरे प्रामाणिक आम्ही कार्यकर्ते आहोत, शेतकऱ्यांच्या घरातील लोक असतो,” असं मत सक्षणा सलगर यांनी व्यक्त केलं.

“यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल”

सक्षणा सलगर पुढे म्हणआल्या, “मला आमदारांना सांगायचं आहे की, ‘तुमसे पहिले भी बहोत सिकंदर थे और तुम्हारे बाद भी बहुत सिकंदर होंगे’. यामुळे कदाचित नव्या चेहऱ्यांना गरिबांना संधी मिळेल. संधी मिळो अथवा नाही, आम्ही शरद पवारांबरोबर आहोत.”

हेही वाचा : बंडानंतर खासदारकीचा राजीनामा देणार होता त्याचं काय झालं? अमोल कोल्हे म्हणाले, “शरद पवारांनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आयत्या आमदारक्या लाटणारे आम्ही नाही, त्यामुळे त्यांनी…”

“मी नाही, तर कार्यकर्ते म्हणत आहेत की, ते बाजारू विचारवंत आहेत. त्यांनी आम्हाला शिकवू नये. ‘बेटे तूम अभी नये हो, हम २०१० से हैं’. आयत्या आमदारक्या लाटणारे आम्ही नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्हाला आमदारकी नाही दिली तरी चालेल, महाराष्ट्र बघेल की खऱ्या अर्थाने लढणारे आम्ही सामान्य घरातील लोक आहोत,” असं म्हणत सक्षणा सलगर यांनी बंडखोरांवर टीका केली. त्या टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.