मुंबई : ब्रिटिशकालीन प्रभादेवी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी, दक्षिण मुंबईतील रस्ते वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या पर्यायी पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. यातच आता लोकल सेवा कोलमडण्याची चिन्हे दिसून येत आहेत. प्रभादेवी उड्डाणपुलाच्या पाडकाम आणि बांधकामासाठी महारेलने मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे ८२ ब्लाॅकची मागणी केली असून मध्य आणि पश्चिम रेल्वे ब्लाॅक देण्याबाबत नियोजन करीत आहे.

प्रभादेवी उड्डाणपुलावरून दररोज लाखोंच्या संख्येने वाहनांची वाहतूक होत होती. परंतु, १९१३ साली बांधण्यात आलेला पूल सध्याच्या रहदारीसाठी अडचणीचा ठरला होता. खूप कमी लोकसंख्येचा विचार करून त्यावेळी या पुलाची उभारणी करण्यात आली होती. परंतु, आता या उड्डाणपुलाची गतिशीलता वाढवण्याच्या उद्देशाने जुना प्रभादेवी उड्डाणपूल पाडून, त्याजागी नवीन दुमजली उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. हा पूल बंद केल्याने येथील वाहतूक करी रोड पुलावरून वळवण्यात आली आहे. त्यामुळे भारतमाता, लालबाग, परळ, चिंचपोकळी या भागात वाहतूक कोंडी होत आहे.

वाढत्या वाहतूक कोंडीमुळे बेस्ट बसचे मार्ग वळविण्यात येत आहेत. तसेच, दादर येथील टिळक पूल व इतर पर्यायी पुलावरील वाहतूक कोंडी वाढली आहे. वाहतूक कोंडीमुळे या पुलाला जोडणाऱ्या जोड रस्त्यावरील दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वेग मंदावला आहे.

प्रभादेवी उड्डाणपूल ब्रिटिश काळात बांधण्यात आला होता आणि ११२ वर्षांहून अधिक काळ दक्षिण मुंबईच्या वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा भाग होता. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, त्याचे पाडकाम लवकरच सुरू होईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडी) महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडवर (महारेल) प्रभादेवी येथील जुन्या पुलाचे पाडकाम आणि दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याची जबाबदारी सोपवली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील पाडकाम आणि बांधकाम महारेल करणार आहे.

महारेलने मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे ८२ ब्लाॅकची मागणी केली आहे. एक ब्लाॅक कमीत कमी ४ तासांचा यानुसार ८२ ब्लाॅक घेण्यात येतील. या ब्लाॅकचे नियोजन मध्य आणि पश्चिम रेल्वेतर्फे केले जाईल. रात्रीच्या वेळी लोकल बंद असताना पुलाचे पाडकाम वेगात केले जाईल.

तसेच दिवसा काही छोटे ब्लाॅक किंवा मेगाब्लाॅक घेऊन तोडकाम केले जाईल. दोन ८०० मेट्रिक टन क्रेनचा वापर करून सध्याच्या उड्डाणपुलाचे पाडकाम करण्यात येईल. हे काम पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील सेवांमध्ये व्यत्यय न आणता अंमलात आणले जाईल, अशी माहिती महारेलतर्फे देण्यात आली. या ८२ ब्लाॅकच्या कालावधीत पुलाचे बांधकाम केले जाईल, असे महारेलद्वारे सांगण्यात आले.