मुंबई : मुंबई महानगरपालिका भांडुप संकुल येथे प्रतिदिन २ हजार दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारत आहे. पाणीपुरवठ्याची मागणी वाढत असल्याने भांडुप संकुल येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे.

भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महानगराच्या प्रमुख भागाला पाणीपुरवठा केला जातो. भांडुप संकुल आशियातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे. या प्रकल्पाची एकत्रित पाणी शुद्धीकरणाची क्षमता प्रतिदिन २,८१० दशलक्ष लिटर इतकी आहे. भांडुप येथे प्रतिदिन अनुक्रमे सुमारे १,९१० दशलक्ष लिटर आणि ९०० दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरण करणारी दोन युनिट्स आहेत. पाणीपुरवठ्याच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी भांडुप संकुल येथे २००० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येत आहे. या नवीन जलशुद्धीकरण केंद्रामुळे एकूण १ हजार २३५ झाडे बाधित झाल्याने त्यांच्या पुनर्लागवडीची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे.

१२०० झाडे बाधित

या प्रकल्पामुळे सुमारे १ हजार २३५ झाडे बाधित झाली आहेत. यापैकी एकूण ४३८ झाडांची पुनर्लागवड भांडुप संकुल परिसरात यशस्वीपणे करण्यात आली आहे. तर, उर्वरित ८३५ झाडांची भरपाई म्हणून ११ हजार ४४३ झाडे तानसा तलाव परिसरात नव्याने लावण्यात येत आहेत. यापैकी सुमारे १० हजार झाडांची लागवड तानसा तलावाच्या पायथ्याशी करण्यात आली आहे.

नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे बाधित १ हजार २३५ झाडांपैकी ४३८ झाडांची पुनर्लागवड संकुलाच्या परिसरातच करण्यात आली आहे. ‘रूट बॉल’ पद्धतीचा अवलंब केल्यामुळे पुनर्लागवड केलेली झाडे जगण्याचा दर (Survival Rate) १०० टक्के आहे. पुनर्लागवड केलेल्या झाडांना नव्या कळ्या, पाने व कोवळ्या फांद्या फुटू लागल्या आहेत.

तानसा तलावाच्या पायथ्याशी १० हजार झाडांची लागवड

उर्वरित बाधित ८३५ झाडांची भरपाई म्हणून तानसा धरणाच्या पायथ्याशी सुमारे १० हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे. आणखी १ हजार ४४३ झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.