मुंबई : कोकणातील जमिनी परप्रांतीयना खरेदी करता याव्यात यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जाचा गैरवापर करण्यात आला. बँकेतील अवैध कर्ज वाटपाच्या घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार राज्याचे मत्सोद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे असून या कर्जवाटपाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार व बँकेचे माजी अध्यक्ष राजन तेली यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे.
मंत्री राणे जिल्हा बँकेचे सहसंचालक आहेत. त्यांनी बँकेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दबाव टाकून मोठ्या रकमांची कर्जे वाटप केली. बँकेत मानधनावर असलेल्या कामगारांना आठ कोटीपर्यंत कर्जे दिली. बँक कार्यक्षेत्र बाहेरील व्यक्तींना अशीच नियमबाह्य कर्जे दिली गेली. त्यासाठी स्थानिक रहिवासी असल्याचे खोटे दस्तऐवज तयार केले. काजू लागवडीसाठी कर्जे उचलली, प्रत्यक्षात करोडोंच्या जमिनी खरेदी करण्यात आल्या. त्या जमिनीच्या भूखंड विक्रीतून नफा कमावला जात आहे, असा आरोप तेली यांनी केला.
अनेक कर्जांना एकच भूखंड तारण आहे. तारण भूखंडाचे मूल्य फुगवण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था तसेच भूखंड विक्री व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना कर्जे देण्यात आली. त्यासाठी पर्यटन प्रकल्प असल्याचे दाखवण्यात आले. विरोध डावलून कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या. मंत्री नितेश राणे यांनी बँक संचालक असताना स्वत:च्या कंपनीसाठी १३ कोटींचे कर्ज उचलले. नााबर्ड आणि आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वाचे राणे यांनी कर्ज घेऊन उल्लंघन केले, असा दावा तेली यांनी तक्रारीमध्ये केला आहे.
जिल्हा बँकेच्या शेकडो कोटींच्या कर्जांचा जमीन खरेदीसाठी दुरुपयोग करण्यात आला. अवैध कर्जांमुळे बँकेचा सीडी रेशो ९३ टक्केवर गेला आहे. बँकेवर दिवाळखोरीची टांगती तलवार आहे. याप्रकरणी मंत्री नितेश राणे, बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच बँकेच्या कर्ज वितरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी तेली यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे.
तेली आणि त्यांच्या दोन मुलांनी वर्ष २०२२ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून घेतलेल्या ९ कोटी २० लाख रुपयांच्या कर्जाचा गैरवापर केल्याप्रकरणाची केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी प्रलंबित आहे. त्या पार्श्वभूमीवर तेली यांनी राणे यांच्यावर आरोप केले आहेत. आरोप-प्रत्यारोप करणारे दोन्ही नेते हे भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांचेच आहेत.
कोण आहेत राजन तेली?
तेली हे एकेकाळी नारायण राणे यांचे समर्थक होते. मात्र जिल्हा बँक निवडणुकीमध्ये नितेश राणे यांच्याबरोबर त्यांचे बिनसले. अखंड शिवसेना, काँग्रेस, अपक्ष, भाजप, उद्धव सेना असा राजकीय प्रवास केलेल्या तेली यांनी परवाच्या दसरा मेळाव्यात शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. बँक कर्जप्रकरणाची चौकशी टाळण्यासाठी तेली यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची चर्चा आहे.
नाबार्ड, सहकार निबंधक, स्थानिक पोलीस यांच्याकडे सिंधुदुर्ग बँकेच्या अवैध कर्जवाटपाच्या तक्रारी मी वारंवार केल्या आहेत. मात्र याप्रकरणाची संबंधित यंत्रणांनी दखलच घेतली नाही. अखेर राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे परवा मी तक्रारी केली. – राजन तेली, माजी आमदार, शिवसेना (शिंदे गट)
जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेचा दुरुपयोग केला म्हणून केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ज्या व्यक्तीची चौकशी चालू आहे, अशा व्यक्तीचे आरोप गांभीर्याने घेण्याची मला बिल्कुल आवश्यकता वाटत नाही. माझ्यावरील त्यांनी केलेल्या आरोपांची उत्तरे संबंधित जिल्हा बँक आणि स्थानिक पोलीस हे देतील. – नितेश राणे, मत्सोद्योग व बंदरे विकास मंत्री, महाराष्ट्र