“महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,” अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना रोखठोक मधील आपल्या लेखातून साद घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुंबई असो की महाराष्ट्र.. एकच ब्रँड.. छत्रपती शिवाजी महाराज!!” असं नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, राऊत यांच्या या भूमिकेवर मनसे नेत्यांनी काहीशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे व महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी राऊत यांना सुनावल्याचे दिसून आले आहे.

“महाभारतामध्ये कर्णाच्या रथाचं चाक जेव्हा जमिनीत रुतलं होतं तेव्हा कृष्णाने कर्णाला जो प्रश्न विचारला तोच मला आज शिवसेनेला विचारायचा आहे. अभिमन्यू जेव्हा एकटा लढत होता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म कर्णा?” अशा शब्दांमध्ये संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्या रोखठोकमधील सादेला उत्तर दिले आहे.

तर, “शॅडो संपादक महाशय, अगदी रोखठोकपणे सांगायचं तर महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फायरब्रँड एकच…राजसाहेब ठाकरे” अशा शब्दांत खोपकर यांनी संजय राऊत यांना प्रतिक्रिया दिली आहे.

खोपकर म्हणाले, “सगळीकडून कोंडीत सापडलात म्हणून लगेच तुम्हाला ठाकरे ब्रँडचं कसं होणार अशी चिंता वाटत असली तरी ती तुमच्यापर्यंतच ठेवा. मनसैनिकांना राज ठाकरे या ब्रँडबद्दल, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल कधीही शंका नव्हती आणि भविष्यात कधी असणार नाही. तुम्ही तुमचा स्वाभिमान गुंडाळून ठेवलाय, पण त्यात आमच्या राजसाहेबांना खेचू नका. एक मात्र खरं, तुमचा आवाज लेख सगळीकडे व्हायरल झालाय तो राजसाहेबांच्या उल्लेखामुळेच, हे ध्यानात असू द्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane says mumbai or maharashtra a single brand msr
First published on: 13-09-2020 at 16:40 IST