मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऑरेंज गेट, पूर्वमुक्त मार्ग – मरिन ड्राईव्ह भुयारी मार्ग (पोहच मार्ग) प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा मागविल्या आहेत. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने या निविदेला मुदतवाढ देण्याची नामुष्की एमएमआरडीएवर ओढवली आहे. आता इच्छुकांना ८ मेपर्यंत निविदा सादर करता येणार आहे.
पुणे, नवी मुंबई आणि ठाण्याहून दक्षिण मुंबईत येणे सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने २०१३ मध्ये १६.८ किमी लांबीचा पूर्वमुक्त मार्ग बांधला. या मार्गामुळे चेंबूर – सीएसएमटी अंतर केवळ २० ते २५ मिनिटांत पार करणे शक्य झाले आहे. मात्र ऑरेंज गेटजवळ आल्यानंतर नरिमन पॉईंटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. या वाहतूक कोंडीतून वाहनांची सुटका करण्यासाठी एमएमआरडीएने पूर्वमुक्त मार्ग, ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्हदरम्यान भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, नवी मुंबई, ठाण्याहून मुंबईत येणाऱ्या वाहनांना थेट दक्षिण मुंबईत पोहोचणे सोपे व्हावे या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जपानमधील मे. पडॅको कंपनीने या साडेतीन किमी लांबीच्या प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर एमएमआरडीएने भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी फेब्रुवारी २०२३ मध्ये निविदा जारी केल्या.
हेही वाचा >>>मुंबईः बदनामीची धमकी दिल्यामुळे तरूणीची आत्महत्या
निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २४ एप्रिल होती. मात्र या मुदतीत एकही निविदा सादर झालेली नाही. त्यामुळे निविदा प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आता इच्छुक कंपन्यांना ८ मेपर्यंत निविदा सादर करता येणार आहे.
असा आहे भुयारी मार्ग
ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह भुयारी मार्ग
लांबी ३.५ किमी
जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र भुयार
एकूण खर्च सहा हजार कोटी रुपये
ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह अंतर केवळ पाच मिनिटांत पार करता येणार
जून – जुलैमध्ये कामास सुरुवात करण्याचे नियोजन
२०२५ मध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट