करोना विषाणूच्या संसर्गानंतर आता जगभर मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत आहेत. आफ्रिकन देशांसोबत युरोपातही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जगभराची चिंता वाढताना दिसत आहे. मंकीपॉक्सच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेनं तयारी सुरू केली आहे. अद्याप मुंबईत मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र सतर्कतेचं पाऊल म्हणून मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं योग्य ती पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
मुंबई महापालिकेनं याबाबत एक निवेदन जारी करून शहरातील सर्व रुग्णालयांना सतर्क केलं आहे. तसेच रुग्णांमध्ये मंकीपॉक्सची लक्षणं आढळल्यास संशयित रुग्णाला त्वरित कस्तुरबा रुग्णालयात पाठवावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मंकीपॉक्सचे रुग्ण आढळलेल्या देशातून परत आलेल्या भारतीय प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत असल्याची माहिती देखील महापालिकेकडून देण्यात आली आहे.
जगभरात मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष तयार केला आहे. तसेच संशयित रुग्णाचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शनिवारपर्यंत जगभरातील १२ देशात एकूण ९२ मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. तसेच इतर २८ संशयित रुग्ण रुग्णालयाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीला ताप, डोकेदुखी, पाठ आणि मांसपेशींमध्ये वेदना होतात. त्याचबरोबर थकवा जाणवतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या चेहरा आणि अंगावर मोठे फोड येतात. काही रुग्णांच्या डोळ्यांवरही याचा प्रभाव जाणवतो. मंकीपॉक्समुळे मृत्यू होण्याचं प्रमाण ११ टक्क्यांपर्यंत आहे. लहान मुलांना सर्वाधिक मृत्यूचा धोका असतो. मंकीपॉक्सवर आतापर्यंत कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. लशीमुळे मंकीपॉक्स आटोक्यात येत असल्याचं दिसून आलं आहे. यावर अजूनही संशोधन सुरू आहे.