गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी कोकणात पोहोचणाऱ्या गाडय़ांचे आरक्षण सुरू झाल्यानंतरच्या दुसऱ्या मिनिटाला या सर्व गाडय़ा फुल्ल झाल्या असल्या, तरी या प्रकरणात कोणताही घोटाळा झाला नसल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. देशभरात रेल्वेची एकूण ३१२५ आरक्षण केंद्रे आहेत. त्याशिवाय आता ऑनलाइन आरक्षणाची सोय झाल्यामुळे प्रवाशांना घरबसल्या आरक्षण करता येते. त्यामुळे आरक्षण सुरू झाल्यानंतर अक्षरश: काही क्षणांतच एखादी गाडी पूर्ण आरक्षित होऊ शकते. तसेच कोकणकन्या गाडीच्या २८ ऑगस्टच्या आरक्षण यादीतील नावांमध्येही घाऊक आरक्षणांची संख्या नगण्य आहे. तसेच ही आरक्षणे प्रामुख्याने मुंबईतूनच झाली आहेत, असेही मध्य रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले.
गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या गाडय़ा गेल्या वर्षी पाच मिनिटांतच फुल्ल झाल्या होत्या. यंदा हा पाच मिनिटांचा विक्रम मोडला असून आरक्षण सुरू झाल्यानंतर केवळ एका मिनिटातच कोकणकन्या पुरेपूर भरली आणि दुसऱ्या मिनिटाला प्रतीक्षा यादी भरभरून वाहू लागली. या विक्रमामागे तिकीट दलाल आणि रेल्वे अधिकारी यांची साखळी असून यामागे मोठा घोटाळा असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला होता.
देशभरात एकूण ३१२५ आरक्षण केंद्रे आहेत. या आरक्षण केंद्रांमध्ये किमान दोन ते कमाल ६० तिकीट खिडक्या आहेत. तसेच ऑनलाइन आरक्षण सुविधा संगणक आणि मोबाइलमुळे प्रत्येकाच्या घरात पोहोचली असल्याने एकाच वेळी अनेक ठिकाणांहून एकाच गाडीचे आरक्षण होऊ शकते. त्यामुळे एका मिनिटात आरक्षण फुल होणे हे अत्यंत स्वाभाविक आहे. त्यात कोणताही घोटाळा नाही, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. हे काम दलालांकडूनही झाले नसल्याचे लक्षात येते, असेही ते म्हणाले.
आरक्षण कसे, कुठून?
* प्रथम श्रेणी वातानुकुलित – ६ आसनांचे आरक्षण ८.०१ वाजता फुल्ल. आरक्षण आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून.
* द्वितीय श्रेणी वातानुकुलित आरक्षण – १८ आसनांचे आरक्षण ८.०० वाजता फुल्ल. आरक्षण लोकमान्य टिळक टर्मिनस, नवसारी, भिलाड, तिरुपती, कुडाळ आणि भायखळा येथून
* तृतीय श्रेणी वातानुकुलित – १३३ आसनांचे आरक्षण ८.०० वाजता फुल्ल. आरक्षण वापी, भक्ती नगर, सीएसटी, मुंबई सेंट्रल, सासाराम, भाईंदर, औरंगाबाद, भायखळा, दाहोद, माहीम, तळेगाव, बोरिवली, नाशिक आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून
* शयनयान श्रेणी – ८.०१ मिनिटांनी सर्व आरक्षण फुल्ल. आरक्षण नाशिक, सीएसटी, बोईसर, मुंबई सेंट्रल, नेव्ही नगर, मालाड, कांदिवली, लोणावळा, देवळाली, भाईंदर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून.