दिवसा गोंगाट जास्त; ठाणे, कल्याण, नवी मुंबई तुलनेत शांत
कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांची संख्या यंदाच्या दिवाळीत कमी झाले असली तरी मुंबईत दिवसा आवाज वाढला आहे. ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने दिवाळीच्या दिवसांमध्ये मुंबईत विविध ठिकाणी पाहणी केली. त्यात गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी दिवसाचा गोंगाट वाढला असल्याचे आढळून आले आहे. यामागची नेमकी कारणे अद्याप सिद्ध झाली नसली तरी फटाक्यांसह वाढती वाहने, गर्दी आणि बांधकामांमुळे मुंबईत सदासर्वकाळ आवाजाची पातळी उच्च राहत असावी, अशी शक्यता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
राज्यभरातील सर्व २६ महानगरपालिका क्षेत्रांत १५८ केंद्रांवर ११ ते १३ नोव्हेंबरदरम्यान दिवाळीतील ध्वनी प्रदूषणाचे मापन मंडळाने केले. मुंबईत ४५ केंद्रांवर ध्वनिमापन झाले. फटाक्यांमुळे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाबाबत गेली काही वष्रे प्रभावी जनजागृती होत असल्याने मुंबईसह राज्यभरात फटाक्यांचे आवाज या वेळी कमी असल्याचे अनुभवायला मिळाले. विविध संस्थांनी केलेल्या ध्वनिमापनातही ते दिसून आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत आकडेवारीनुसारही गेल्या काही वर्षांच्या तुलनेत रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत आवाजाची कमाल मर्यादा खाली आल्याचे दिसून आले.
मुंबई आणि कोल्हापूर वगळता इतर महानगरपालिका क्षेत्रांमध्ये दिवसा व रात्रीच्या आवाजाच्या पातळीत या वर्षी घट दिसून आली. मुंबई महानगरीत मात्र दिवसाचा आवाज वाढला आहे. सकाळी सहा ते रात्री दहा या काळात गेल्या वर्षीपेक्षा प्रत्येक दिवशी आवाजाची पातळी वाढल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती मंडळाचे वैज्ञानिक अधिकारी एस. सी. कोल्लूर यांनी दिली. या पाश्र्वभूमीवर सतत आवाज सुरू असल्याने फटाक्यांचे आवाज व संख्या कमी होऊनही मुंबईचा दिवसाचा गोंगाट कमी झाला नाही. शहरातील ४५ पकी बहुतांश केंद्रांवर हीच स्थिती दिसून आली, असे निरीक्षणही कोल्लूर यांनी नोंदवले. दक्षिण मुंबई व पश्चिम उपनगरात २०१४ च्या तुलनेत या वर्षी दिवसाचा आवाज वाढला (पान १वरून)
आहे. पूर्व उपनगरात संमिश्र चित्र आहे. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर यात दिवसा आवाजात घट झाली आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक येथेही ध्वनी प्रदूषण कमी होत आहे. मात्र कोल्हापूरमध्ये दिवसा व रात्री या दोन्ही वेळा आवाजाची पातळी वाढलेली आढळली. या निरीक्षणांचा विस्तृत
विश्लेषण अहवाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
आवाजाची पातळी नेमकी कोणत्या घटकांमुळे वाढते आहे, ते अद्याप सिद्ध झालेले नाही. मात्र वाहने, गर्दी तसेच बांधकामांचा आवाज सतत सुरू असल्याने मुंबईत आवाजाची पातळी उच्च राहत असावी, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले. दिवाळीच्या दिवसात पीएम १० आणि पीएम २.५ या धूलिकणांमध्येही वाढ दिसून आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
