मुंबई : हत्या, हत्येचा प्रयत्न, शस्त्रास्त्र बाळगणे अशा आठहून अधिक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या तामिळनाडूमधील कुख्यात गुंडाला चेंबूरमध्ये पकडण्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले. पाठलाग करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याला ट्रान्झिट रिमांडद्वारे तामिळनाडू येथे पाठवण्यात येणार आहे.

चिन्न सुब्बाराव अयनार (२४) असे अटक आरोपीचे नाव असून तो तामिळनाडूमधील वेल्लोर येथील रहिवासी आहे. आरोपीविरोधात तामिळनाडू येथील मंगलम व वेल्लोर पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल आहेत. त्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, शस्त्राचा धाक दाखवून धमकावणे अशा गंभीर गुन्ह्यांचा सहभाग आहे. हत्येच्या गुन्ह्यांतील आरोपी मुंबईत सक्रिय असल्याची माहिती ‘कक्ष ६’चे पोलीस हवालदार नागनाथ जाधव यांना मिळाली होती. तो चेंबूर येथील आरसीएफ परिसरातील पेट्रोल पंपावर कार्यरत असल्याचे त्यांना समजले. तपासणीत त्याच्याविरोधात तामिळनाडू येथे हत्येचा गुन्हा दाखल असल्याचे समजले. त्या अनुषंगाने ‘कक्ष ६’ कार्यालयाचे अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके तयार करण्यात आली. या दोन्ही पथकांनी मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्याकरिता एल. यू. गडकरी मार्ग, वाशी नाका, चेंबूर येथे आठ तास पाळत ठेवली. तेथे उभ्या असलेल्या ३० ते ४० टँकरची पथकातील अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी एक व्यक्ती अचानक पळू लागला. त्यावेळी दोन्ही पथकांतील अधिकारी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्या व्यक्तीला कक्ष कार्यालयात आणून त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने गुन्हा केल्याचे कबुल केला. त्यानंतर तामिळनाडू पोलिसांना संबंधित गुन्ह्यातील आरोपीला पकडल्याची माहिती देण्यात आली.

हेही वाचा – पिंपरीत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; १७,५०० घरांमध्ये सापडल्या अळ्या

हेही वाचा – पुणे : पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्याची हिंंमत येते कोठून?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेल्लोर दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. कुमार तपासासाठी मुबंईत दाखल झाले. त्यांनी आरोपीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. शताब्दी रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणी करून त्याला सुटीकालीन न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्याचा ट्रान्झिट रिमाड घेण्यात येणार आहे. आरोपीच्या अटकेमुळे तामिळनाडूमधील वेल्लोर व मंगलम पोलीस ठाण्यातील ८ ते १० गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. त्यात हत्या, हत्येचा प्रयत्न अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. तामिळनाडू पोलीस त्याचा शोध घेत असल्यामुळे तो ओळख लपवून मुंबईत राहात होता. गेल्या काही दिवसांपासून तो चेंबूर येथे काम करीत होता. तामिळनाडू पथक सोमवारी त्याला घेऊन वेल्लोरला रवाना होण्याची शक्यता आहे.