समुद्रातील दुर्मिळ आणि संरक्षित प्रजाती जाळ्यात अडकल्यानंतर त्यांची सुटका करावी लागते. प्रसंगी मच्छिमारांना त्यांचे जाळे कापावे लागते. जाळी कापून दुर्मिळ संरक्षित प्रजातींची सुटका करण्यात आल्याच्या आठ प्रकरणांमध्ये कांदळवन कक्ष व प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>मुंबई : नायर इस्पितळातील औषध दुकानात परवाना नसलेल्या औषधांचा पुरवठा !

‘वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२’ मध्ये अनेक सागरी प्रजातींचा समावेश आहे. यामध्ये निळा देव मासा, ब्रुडीज देवमासा, डॉल्फिन, करवत मासा, व्हेल शार्क, सागरी कासवे आदी प्रजातींचा समावेश आहे. या दुर्मिळ आणि संरक्षित सागरी जीवांचे संवर्धन व्हावे यासाठी कांदळवन कक्ष आणि मत्स्य विभाग, राज्य सरकार यांनी डिसेंबर २०१८ पासून भरपाई योजना सुरू केली आहे. संरक्षित प्रजाती मासेमारीच्या जाळ्यात अडकल्या, तर जाळे कापून त्यांना पुन्हा समुद्रात सुरक्षितरित्या सोडणाऱ्या मच्छिमारांना कापलेल्या जाळ्यापोटी भरपाई म्हणून कमाल २५ हजार रुपये दिले जातात. कांदळवन कक्ष व प्रतिष्ठानाने मंगळवारी नुकसानभरपाई योजनेअंतर्गत एक लाख रुपये भरपाई दिली. रत्नागिरी येथील सहा आणि सिंधुदुर्ग येथील दोन मच्छिमारांकडून प्राप्त झालेल्या एकूण आठ प्रकरणांमध्ये चार ग्रीन सी कासव, दोन ऑलिव्ह रिडले कासव आणि दोन हॉक्सबिल समुद्री कासवांची जाळे कापून सुटका करण्यात आली होती, अशी माहिती कांदळवन कक्ष आणि प्रतिष्ठानामधील अधिकाऱ्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One lakh rupees compensation to konkan fishermen mumbai print news amy
First published on: 12-10-2022 at 13:30 IST