लोकसत्ता टीम

नागपूर : उपराजधानीत तृतीयपंथीय सामान्यांकडून जबरदस्तीने वसुली करत असल्याचे चित्र आहे. लग्न असलेल्या घरातून तृतीयपंथीय ५ ते ११ हजार रुपयांची वसुली करतात. तसेच ते गर्भवती महिला असलेल्या घरांचा शोध घेतात. या घरांना भेट देत येथे मुलगा जन्मल्यास सोन्याची साखळी मागतात, प्रसंगी त्यासाठी दमही देतात.

नागपुरातील विविध भागात ट्रॅफिक सिग्नलवर किंवा घरगुती समारंभात तृतीयपंथीयांकडून पैसे मागण्याचे प्रकार नवीन नाही. कधी कधी तृतीयपंथीय पैसे मागण्यासाठी बळजबरी करतात. पैसे देण्यास नकार देणाऱ्यांशी वाद घातला जातो. नागपूर शहर पोलिसांनी मध्यंतरी बळजबरी करणाऱ्या तृतीयपंथीयांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे शहरातील विविध भागातील सिग्नलवर तृतीयपंथीय दिसण्याचे प्रमाण कमी झाले.

आणखी वाचा-काँग्रेस आमदार विकास ठाकरेंचे आरोपसत्र, रोख कोणाकडे?

शहरातील तृतीयपंथीयांनी आता वेगवेगळ्या भागातील नागरी वस्त्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. येथे लग्न असलेल्या घरातून ५ ते ११ हजार रुपयांची वसुली केली जात आहे. त्याचप्रमाणे गर्भवती महिला असलेल्या घरांचाही तृतीयपंथीय शोध घेतात, या घरात जाऊन प्रथम ते भिंतीच्या दर्शनी भागात विशिष्ट क्रमांक व चिन्ह नोंदवतात. त्यानंतर संबंधित कुटुंबीयांना मुलगा जन्मल्यास किमान सोन्याची साखळी देण्याबाबत दबाव टाकतात.

नागपुरातील झिंगाबाई टाकळी, बाबा फरीदनगर, गायत्रीनगरसह या भागात हल्ली हा प्रकार जास्तच वाढला आहे. पैसे देण्यास कुणी नकार दिल्यास तृतीयपंथीय त्यांच्याशी उद्धट बोलून नातेवाईकांपुढे त्यांचा अपमान करतात. वाद टाळण्यासाठी काही जण गुपचूप पैसे देऊन मोकळे होतात. तरीही शहर पोलीस काहीही करत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा-धक्कादायक! तोतया वकील महिलेने मागितली १.१० लाखांची खंडणी

कर्ज करून पैसे द्यावे काय?

घरात एखादे लग्न असल्यास गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येक सदस्य पैसे वाचवून नियोजन करतो. आर्थिक अडचण येऊ नये म्हणून जवळच्या नातेवाईकांकडूनही उसनवारीवर पैसे घेतले जातात. परंतु तृतीयपंथीय या पद्धतीने सामान्यांना लुटत असल्याने त्यांना कर्ज करून पैसे द्यावे का? हा प्रश्न झिंगाबाई टाकळीसह परिसरातील नागरिक नाव न टाकण्याच्या अटीवर विचारत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर पोलिसांनी यापूर्वीच तृतीयपंथीयांबाबत अधिसूचना काढली आहे. तृतीयपंथीयांना कुणाकडूनही बळजबरीने पैसे घेता येत नाही. तृतीयपंथीय त्रास देत असल्यास नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. यापूर्वीही पोलिसांनी नियम मोडणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाई केली आहे. -निमित गोयल, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा, नागपूर.