मुंबई : पाकिस्तानमधून आलेले सुके खजूर व सौंदर्यप्रसाधनांनी भरलेले २८ कंटेनर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) जप्त केले आहेत. न्हावा शेवा बंदरात ही कारवाई करण्यात आली. या मालाची एकूण किंमत जवळपास १२ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाक संबंध बिघडले आहे. हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानकडून होणाऱ्या थेट किंवा अप्रत्यक्ष आयातीवर पूर्ण बंदी घातली होती. मात्र बेकायदेशीररित्या पाकिस्तानातून तस्करी करून विविध साहित्य आणले जात होेते. त्यानंतर जुलै २०२५ मध्ये सखोल प्रकटीकरण मोहीम सुरुवात करण्यात आली आली. अशीच एक कारवाई महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केली आहे.
पाकिस्तानचे खजूर नाव यू.ए.ई. देशाचे…
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने न्हावा शेवा बंदरात कारवाईकरून २८ कंटेनतर जप्त केले. भारतातील तीन आयातदारांनी आयात केले होते. या आयातदारांनी वस्तूंचे मूळ ठिकाण लपवून त्यांना यूएई देशातून आणल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. आणलेले समान दुबईतील जेबेल अली बंदरातून पाठवण्यात आले होते. मात्र चौकशीत या वस्तू प्रत्यक्षात पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झाले. या कंटेनर मध्ये खजूर आणि सौंदर्यप्रसाधने होती. त्याची किंमत सुमारे १२ कोटी रुपये एवढी आहे. सुके खजूर प्रकरणात दुबई येथील एका पुरवठादाराला अटक झाली असून तो मूळचा भारतीय नागरिक आहे. त्याने पाकिस्तानमधून खजूर मागवून बनावट चलनाद्वारे त्यांना यूएईमधून आलेले दाखवले.
सौंदर्यप्रसाधनांच्या सामानात एका सीमा शुल्क उत्पादन (कस्टम) दलालाचीही भूमिका समोर आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने मालाच्या मूळ देशाची चुकीची नोंद करून तस्करीस मदत केली. संपूर्ण कारवाईत भारत, पाकिस्तान आणि यूएईमधील नागरिकांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचे आढळले. आर्थिक व्यवहारही भारत–पाकिस्तानदरम्यान गुप्तपणे करण्यात आले होते.
महसूल गुप्तचर संचालनालयाने जुलैमध्ये या ऑपरेशनची पहिली फेरी राबवली होती. त्यावेळी ३९ कंटेनरमधील ९ कोटींचा १ हजार ११५ मेट्रिक टन प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला होता. अशा प्रकारचा आयात बंदीचा भंग केल्याने केवळ भारत सरकारच्या धोरणांचे उल्लंघन होत नाही, तर पाकिस्तानमधील सक्रिय गटांशी संबंध असल्याने हे राष्ट्रीय सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण होतो असे महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हटले आहे.