मुंबई : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पातील पनवेल ते इंदापूर अशा ८४ किमीच्या महामार्गाचे काम सध्या वेगात सुरु आहे. आतापर्यंत ८४ किमीपैकी ८० किमीच्या महामार्गाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित चार किमीच्या महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) नियोजन आहे. त्यामुळे हा टप्पा डिसेंबरपासून वाहतुकीसाठी खुला झाल्यास पनवेल ते इंदापूर प्रवास सुकर आणि अतिजलद होण्यास मदत होणार आहे.
मुंबई, कोकण ते गोवा प्रवास सुकर आणि अतिजलद करण्यासाठी दोन पदरी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेत २०११ मध्ये या कामास सुरुवात झाली. कामास सुरुवात होऊन १५ वर्षे झाली तरी हे काम पूर्ण झालेले नाही. या कामाच्या पूर्णत्त्वासाठी सातत्याने नवनवीन तारखा दिल्या जात असल्याने कोकणवासीयांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हा महामार्ग केव्हा पूर्ण होणार याची प्रतीक्षा त्यांना आहे. अशात आता हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सरकारने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार या महामार्गाच्या कामातील पनवेल ते इंदापूर असा ८४ किमीचा टप्पा ज्या एनएचएआयकडे आहे त्यांनी या टप्प्याच्या कामाला वेग दिल्याची माहिती एनएचएआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पनवेल ते इंदापूर अशा ८४.६०० किमी लांबीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. पनवेल ते कासू अशा ४२.३ किमीचा एक टप्पा असून या टप्प्याचे काम मे. जे एम म्हात्रे इन्फ्रा प्रा. लिमिटेडकडून करण्यात येत आहे. तर कासू ते इंदापूर या ४२.३०० किमीच्या महामार्गाचे काम मे. कल्याण टोल इन्फ्रा प्रा. लिमिटेडकडून सुरु आहे. ४५० कोटी खर्चाचे कामही संथगतीने सुरु होते, पण आता मात्र या कामाला वेग दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पनवेल ते कासू या टप्प्याचे ९४ टक्के तर कासू ते इंदापूर या टप्प्याचे ७९ टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण पनवेल ते इंदापूर टप्प्याचे ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे. ८४ किमीच्या महामार्गातील ८० किमीचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ ४ किमीचे काम शिल्लक असून हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. आजच्या घडीला पनवेल ते इंदापूर प्रवास करण्यासाठी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा प्रवास करण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. पण चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन नवीन मार्गिका सेवेत दाखल झाल्यानंतर पनवेल ते इंदापूर प्रवास सव्वा तासात पूर्ण करणे शक्य होईल असेही त्यांनी सांगितले.