नायर रुग्णालयामधील चाचण्यांना पालकांचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई : नायर रुग्णालयात दोन ते १७ वयोगटातील बालकांवर सिरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोवोव्हॅक्स’ या करोना प्रतिबंधात्मक लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या  सुरू झाल्या असून गेल्या १५ दिवसांत १५ बालके यात सहभागी झाली आहेत. यापूर्वी झालेल्या दुसऱ्या लशीच्या चाचणीच्या तुलनेत या लशीच्या चाचण्यांना पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

अमेरिकेतील जैवतंत्रज्ञान कंपनीने निर्मिती केलेली ‘नोवोव्हॅक्स’ या करोना प्रतिबंधात्मक लशीच्या निर्मितीसाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूला परवानगी देण्यात आली असून या लशीचे नाव ‘कोवोव्हॅक्स’ असे आहे. कोवोव्हॅक्स लशीच्या मोठ्या व्यक्तींमधील चाचण्या आधीच सुरू झाल्या असून आता दोन ते १७ वयोगटातील बालकांमध्ये सुरक्षितता आणि परिणामकारकतेच्या चाचण्या केल्या जात आहेत. मुंबईतील नायर रुग्णालयात ९ ऑक्टोबरपासून या चाचण्या सुरू झाल्या आहेत. ‘१५ दिवसांतच या चाचण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून आत्तापर्यंत त्यात १५ जण सहभागी झालेले आहेत. आणखी काही बालके सहभागी होत आहेत, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

चाचण्यांचे निकष

चाचण्याअंतगर्त ९२० बालकांना सहभागी करून घेतले जाणार असून यातील ४६० बालके ही १२ ते १७ वयोगटातील असणार आहेत. दर तीन व्यक्तींमागे एका व्यक्तीला प्लासिबो असे या चाचणीचे स्वरूप असून २१ दिवसांनी दुसरी मात्रा दिली जाणार आहे. आरोग्यदृष्ट्या सुदृढ असलेल्या बालकांना यात सहभागी होता येणार असून यासाठी पालकांची लेखी संमतीही घेतली जाणार आहे. तेव्हा अधिकाधिक पालकांनी यात सहभागी झाल्यास चाचण्या यशस्वी होऊन बालकांसाठी लवकर लस उपलब्ध होऊ शकेल, असे डॉ. भारमल यांनी सांगितले.

या पूर्वीच्या एका लशीच्या चाचण्यांमध्ये एक लस आणि एक प्लासिबो असे प्रमाण होते. त्यामुळे फारसे पालक येण्यास तयार होत नव्हते. परिणामी सहा महिन्यांत या चाचण्यांमध्ये केवळ १२ बालके सहभागी झाली. परंतु त्या तुलनेत या चाचण्यांमध्ये लशीच्या तुलनेत प्लासिबोचे प्रमाण कमी असल्यामुळे प्रतिसाद चांगला मिळण्याची शक्यता आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

करोना प्रतिबंधात्मक लस बालकांसाठी आवश्यक

बालकांमध्ये विशेषत: पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत बाधित होण्याचे प्रमाण अधिक होते. तसेच एचआयव्ही, क्षयरोग, थॅलेसेमिया, कर्करोग असे विविध आजार असलेल्या बालकांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे यांना करोनाचा धोका अधिक आहे. या बालकांसाठी प्राधान्याने लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. बालकांमध्ये करोनाची बाधा होण्याचा धोका टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे, असे बालरोग तज्ज्ञांच्या समितीतील सदस्य डॉ. बेला वर्मा यांनी सांगितले.