मुंबई : करोनाची धास्ती व निर्बंधांमुळे एसटी सेवांकडे प्रवाशांनी पाठ फिरवली असून त्याचा फटका मुंबई – पुणे मार्गावरील एसटी सेवेलाही बसला आहे. मोठे उत्पन्न मिळवून देणाऱ्या या मार्गावरील प्रवासीसंख्या घटल्याने एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वातानुकूलित शिवनेरी बसची संख्या कमी झाली असून ती वेळेत उपलब्ध होत नसल्याने अनेक प्रवासी खासगी वाहतुकीला पसंती देऊ लागले आहेत. यामुळे महामंडळाची प्रवासीसंख्याही कमी होऊ लागली आहे. करोनापूर्व काळात भाडेतत्वावरील सुमारे १५० शिवनेरी बसगाड्या धावत होत्या. मात्र बस मालकांनी माघार घेतल्यामुळे शिवनेरी बसची संख्या ११० झाली आहे. या मार्गावर येत्या ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने वातानुकूलित शिवाई बस चालवण्याचे नियोजन आहे.

मात्रही या बसगाड्या ताफ्यात समाविष्ट होण्यास विलंब होत असून मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांना बसची कमतरता भासण्याची शक्यता आहे.करोनामुळे मार्च २०२० पासून एसटीची प्रवासीसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. मुंबई आणि पुण्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे या दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या रोडावली. मात्र करोना संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर एसटीची सेवा हळूहळू सुरू झाली. परंतु प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यासाठी एसटी महामंडळानेही फारसे प्रयत्नही केले नाहीत.
करोनापूर्व काळात एसटीच्या ताफ्यात एकूण १४७ शिवनेरी बस होत्या. त्यापैकी ९७ बस एसटीच्या मालकीच्या आणि ५० बस भाडेतत्वावरील होत्या. आता शिवनेरीची संख्या एकूण ११० झाली आहे.

हेही वाचा : फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाला हिरवा कंदील ; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

यापैकी ९० मालकीच्या आणि २० भाडेतत्त्वावरील आहेत. शिवनेरीसह शिवशाही बसही या मार्गावर चालवण्यात येतात. तसेच दोन अश्वमेध आणि निमआराम बसही उपलब्ध आहेत. मात्र मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरी एसटीची ओळख बनली आहे. बसची कमी झालेली संख्या आणि खासगी वाहतुकीकडेही वळलेले प्रवासी यामुळे या मार्गावरील एसटीची धाव काही प्रमाणात कमी झाली आहे. सध्या मुंबईतून सोडण्यात येणाऱ्या या सर्व प्रकारच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रतिदिन सरासरी १,८०० इतकी आहे. तर करोनापूर्व काळात ही संख्या तीन हजारपेक्षा अधिक होती. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाणही असेच कमी झाले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

‘शिवाई’ला विलंब

महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्याने १५० वातानुकूलित बस दाखल होणार असून पहिल्या टप्यात ५० बस आणि दुसऱ्या टप्प्यात १०० बस दाखल होतील. ५० पैकी दोन बस पुणे अहमदनगर – पुणे मार्गावर धावत आहेत. पुणे-नाशिक-पुणे, पुणे-औरंगाबाद-पुणे, पुणे-कोल्हापूर-पुणे आणि पुणे-सोलापूर-पुणे मार्गावर या बस प्रवाशांच्या सेवेत येतील. पहिल्या टप्प्यात येत्या जुलैअखेरीस १७ बस, दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबरपासून १७ आणि जानेवारी २०२३ पासून १६ बस सेवेत दाखल होणार होत्या. एकूण १०० ‘शिवाई’ बसपैकी ९६ बसचे मार्ग आणि तारीखही निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा : मुंबईतील घरभाडे महागले ; वरळीतील आलिशान घरांच्या भाड्यात १८ टक्क्यांनी वाढ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई, ठाण्यातून पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेटसाठी येत्या ऑक्टोबरपासून टप्प्याटप्याने ‘शिवाई’ बस सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात ९६ पैकी ऑक्टोबरपासून ३०, जानेवारी २०२३ पासून ४० आणि एप्रिल २०२३ पासून २६ ‘शिवाई’ बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. मात्र कंपनीकडून झालेला विलंब आणि मुंबई-पुणे मार्गांवर अद्याप उपलब्ध नसलेली चार्जिंग सुविधा यामुळे शिवाइ बस ताफ्यात दाखल होण्यास विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.