मुंबई : भायखळा रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला कचऱ्याचे मोठे ढीग दिसू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी संपूर्ण भायखळ्यातील कचरा जमा करण्यात ये आहे. स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्यानंतरही हा कचरा इथेच टाकला जात आहे. पूर्वीच्या ठिकाणी कचरा टाकण्यास एका विकासकाने विरोध केल्यामुळे आता तो भायखळा स्थानकाबाहेर आणून टाकण्यात येत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

मुंबई महापालिकेने स्वच्छ मुंबईचा वसा घेतला आहे. मात्र मुंबईतील कचऱ्याचे ढीग कमी झालेले नाहीत. मुंबई स्वच्छ व सुंदर दिसावी म्हणून महापालिकेचा घनकचरा विभाग स्वच्छता मोहीम राबवत असला तरी प्रत्यक्षात रस्त्यावरील कचरा कमी झालेला नाही. याचाच प्रत्यय मुंबईकरांना येत आहे. भायखळा स्थानकाबाहेर आल्यानंतरही नागरिकांना कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भायखळा स्थानकाच्या पश्चिमेला आल्याबरोबर प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग दिसतात. या प्रवेशद्वाराला लागूनच बस स्थानक आहे. त्यामुळे बससाठी वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. यापूर्वी बस स्थानकाजवळ कचरा टाकण्यात येत नव्हता. मात्र गेल्या काही दिवसांपासून कचरा टाकण्याची ही नवीनच जागा तयार झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

भायखळा स्थानकाच्या समोरच मंदार निकेतन इमारत असून या इमारतीत डबेवाल्यांच्या संघटनेचे सुभाष तळेकर राहतात. त्यांनी याबाबत सांगितले की बस स्थानकाच्या बाजूला पूर्वी कधीच कचरा टाकण्यात येत नव्हता. भायखळा स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या केळीगल्लीत पूर्वी कचरा टाकला जात होता. परंतु, तेथे एका इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असून विकासकाच्या सांगण्यावरून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिथले कचरा संकलन केंद्र बंद केले व इथे कचरा आणून टाकायला सुरुवात केली, असा आरोप तळेकर यांनी केला आहे.

स्थानक परिसरात आधीच प्रवाशांची गर्दी असते. बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते. त्याच ठिकाणी सकाळी शाळेच्या गाड्या उभ्या असतात. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. सकाळी कचरा उचलण्यासाठी कचऱ्याच्या गाड्या येतात. त्यामुळे वाहनांच्या वर्दळीत भर पडत आहे. या ठिकाणी कचरा संकलन करायला सुरुवात केल्यामुळे कचरा उचलून नेला तरी दिवसभरात पुन्हा पुन्हा तिथे कचरा आणून टाकला जातो. त्यात भाजी बाजारातील कचरा, बॅगा बनवण्याच्या कारखान्यातील व्यावसायिक स्वरुपाचा मोठ्या प्रमाणावर टाकला जात असल्याचेही तेळेकर यांनी सांगितले.

घनकचरा विभागातील अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात, असेही तळेकर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेने हा अनधिकृत कचरा डेपो बंद करावा अन्यथा आंदोलन करावे लागेल, असाही इशारा तळेकर यांनी दिला आहे. दरम्यान, याबाबत मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.