मुंबई : विविध महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) या पक्षांचा दसरा मेळावा लक्षवेधी ठरला. राज्यभरातून दोन्ही पक्षांचे बहुसंख्य कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. तर ‘अरे आवाज कुणाचा ? शिवसेनेचा’, ‘ही ताकद कुणाची ? शिवसेनेची’, ‘अरे कोण आला रे कोण आला ? शिवसेनेचा वाघ आला’, ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘पन्नास खोके; एकदम ओके’, ‘बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो’ आदी घोषणांनी शिवसैनिकांनी (ठाकरे) परिसर दणाणून सोडला होता. याप्रसंगी शिवसैनिकांनी राज – उद्धव एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली.

शिवसेनेच्या (ठाकरे) दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दादर परिसरात मोठ्या प्रमाणात फलकबाजी करण्यात आली होती. तर चौकाचौकात आणि नाक्यानाक्यावर भगवे झेंडे आणि भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. राज्यातील विविध जिल्ह्यांतून शिवसेनेचे कार्यकर्ते गळ्यात भगवा शेला, डोक्यावर टोपी आणि हातात भगवे झेंडे घेऊन दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दाखल झाले होते. तर महिला शिवसैनिकांनी भगवी साडी परिधान केली होती. कोणी रेल्वे तर कोणी खासगी दुचाकी, चारचाकी आणि विशेष बसने दादर गाठत होते. काहींनी आपली वाहने शिवसेनेच्या विविध प्रचार साहित्याने सजवली होती. बहुसंख्य कार्यकर्त्यांनी सभास्थळी पोहोचण्यापूर्वी सर्वप्रथम शिवसेना भवन येथे हजेरी लावली. तसेच शिवसेनेच्या प्रचार साहित्याची विक्री करणारे विविध स्टॉल्स दादर परिसरात थाटण्यात आले होते.

 या स्टॉल्सवर भगवे शेले, टोपी, छोटे झेंडे, भगवे धागे, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा आणि प्रतिमा असलेले पेन, खिशाला आणि गाडीला लावायचे बिल्ले, स्टिकर्स, छोटे व मोठे भगवे झेंडे, मशालीच्या प्रतिकृती आदी विविध वस्तू घेण्यासाठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. तर विशेष बाब म्हणजे ग्रामीण भागातून आलेल्या शिवसैनिकांनी स्वतः सोबत घरची चटणी – भाकर आणली होती. दुपारी मैदानाच्या व रस्त्याच्या कडेला बसून शिवसैनिकांनी चटणी – भाकर खाल्ली. तर मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. तसेच सभास्थळी मैदानात सर्वत्र भगवे झेंडे आणि कार्यकर्त्यांपर्यंत व्यवस्थितपणे भाषण पोहोचण्यासाठी मोठ्या एलईडी स्क्रीन, तसेच ध्वनिक्षेपक लावण्यात आले होते. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दादर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व कार्यकर्त्यांची व्यवस्थित तपासणी करून मैदानात सोडण्यात आले, तसेच दसरा मेळाव्यावर सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजरही होती.

दरम्यान, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पूरपरिस्थतीचे कारण देऊन शिवसेनेला दसरा मेळावा रद्द करण्याचा फुकटचा सल्ला देऊ नये. त्यापेक्षा सरकारच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी आणि शेतकऱ्यांचा पिकाला योग्य हमीभाव द्यावा, अशी मागणीही केली. भाजप, शिंदे गट आणि एकूणच सरकारविरोधात संताप व्यक्त करीत असताना महाराष्ट्राच्या विकासासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशी इच्छाही शिवसैनिकांनी व्यक्त केली. तर काहींनी ‘ठाकरे नावाची दहशत अबाधित राहण्यासाठी दोन भाऊ एकत्र येणे काळाची गरज’, ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज उद्धव – राज’ आदी विविध मजकूर लिहिलेले फलक हाती घेतले होते. तसेच गणेशोत्सवात उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते, याप्रसंगी काढलेल्या एकत्रित कुटुंबाचे समूह छायाचित्र असलेले फलक दादर परिसरात लक्ष वेधून घेत होते.

पावसाच्या सरी, मैदानात चिखल

दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात सकाळी व दुपारच्या सुमारास पावसाच्या सरी बरसल्यामुळे मैदानात चिखल झाला होता. त्यामुळे पंपाच्या सहाय्याने मैदानातील पाणी उपसण्यात आले. परंतु पावसाच्या सरी सायंकाळच्या सुमारासही बरसल्या. तेव्हा काही शिवसैनिक डोक्यावर छत्री व खुर्च्या घेऊन बसले होते.

शर्मिला ठाकरेंकडून पेढे वाटप, अमित ठाकरेंसोबत सेल्फी

अनेक शिवसैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेरही गर्दी केली होती. तेव्हा राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी शिवसैनिकांची भेट घेतली आणि त्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत पेढे वाटपही केले. तर अनेक शिवसैनिकांनी अमित ठाकरे यांचीही भेट घेत त्यांच्यासोबत सेल्फी काढले.