मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद उभारणीचे काम करणाऱ्या कामगारांचे पाय धुवून समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत पोहचण्याचा संदेश दिला. मुंबईतील बूट पॉलिश करणारा कामगारही प्रत्येकाचे चरण स्पर्श करतो. पंतप्रधान समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचे काम करतात. त्यामुळे बूट पॉलिश कामगारांना पैशांच्या मदतीची गरज भासल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वयं सहायता निधीअंतर्गत आर्थिक मदत करण्यात येईल, असे आश्ववासन राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी शनिवारी सीएसएमटी येथील कार्यक्रमात दिले.

हेही वाचा >>> मागाठाणे मेट्रो स्थानकाची आयआयटीच्या तज्ज्ञांनी केली तपासणी; एमएमआरडीएला अहवालाची प्रतीक्षा

तर्पण : संवेदना फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक सहा आणि सात येथे शनिवारी दुपारी मुंबई रेल्वे स्थानकांतील बूट पॉलिश कामगारांना बूट पॉलिशच्या किटचे वाटप करण्यात आले. तर्पण फाऊंडेशनचे प्रमुख आणि आमदार श्रीकांत भारतीय यांच्या संकल्पनेतून हे बूट पॉलिश किट तयार करण्यात आले आहेत. या समारंभास मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, दिग्दर्शक व सिने अभिनेता महेश मांजरेकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नीरज लालवानी, मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दहा बूट पाॅलिश कामगारांना प्रातिनिधीक स्वरुपात बूट पाॅलिश किटचे वाटप करण्यात आले. येत्या तीन महिन्यांत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील ५४० बूट पॉलिश कर्मचाऱ्यांना ‘चरण सेवा’ म्हणून आसन व्यवस्था असलेल्या किटचे वाटप करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> हाफकिनमधील एकाच जागेसंदर्भातील दोन निर्णयांमुळे कर्मचारी संभ्रमात

यावेळी दानवे म्हणाले की, पूर्वीच्या आणि आताच्या रेल्वे कारभारात बदल झाला आहे. सीएसएमटी स्थानकाचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच देशातील १,२५० स्थानकांच्या पुनर्विकासाच्या कामासाठी १२ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद रेल्वेने केली आहे. देशातील रेल्वे सेवा बदलत असून देशात धावत असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी झाला आहे. तसेच रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू असून भविष्यात प्रवाशांना विमानतळासारखी सुविधा मिळणार आहे, असे दीपक केसरकर म्हणाले.