शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर गेल्याने काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी या नाराज झाल्या होत्या, असा गौप्यस्फोट माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केला असला तरी २००७च्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या वेळी प्रतिभाताई पाटील यांचा मुंबई दौरा केवळ याच कारणामुळे रद्द करण्यात आला होता.

२०१२ प्रमाणेच त्याआधी २००७ मध्ये झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. तेव्हा प्रतिभा पाटील यांना मराठी असल्यानेच पाठिंबा जाहीर करीत असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले होते. राष्ट्रपतिपदाची उमेदवारी जाहीर झाल्यावर प्रतिभा पाटील यांना विविध राज्यांचा दौरा केला होता. तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या खासदार-आमदारांच्या भेटीसाठी मुंबईचा दौराही आयोजित करण्यात आला होता.

पाठिंबा जाहीर केल्याने प्रतिभाताईंनी ‘मातोश्री’वर जावे, असा प्रस्ताव तेव्हा पुढे आला होता. काँग्रेस पक्षाच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात प्रतिभाताईंच्या दौऱ्यांचे नियोजन करणाऱ्या पथकातील पदाधिकाऱ्यांना ही बाब खटकली. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीयांना ही बाब कळल्यावर प्रतिभाताईंनी ‘मातोश्री’वर जाऊ नये, असा निर्णय झाला. शिवसेनेने स्वत:हून पाठिंबा दिला असून, काँग्रेसला तेव्हा शिवसेनेच्या मतांची आवश्यकता नव्हती. दिल्लीत बराच खल झाल्यावर प्रतिभाताई पाटील यांचा मुंबईचा दौराच रद्द करण्यात आला. बंगळुरू, हैदराबाद, कोलकत्तासह सर्व मोठय़ा शहरांचा दौरा केलेल्या प्रतिभाताईंचा गृहराज्याचा दौरा झाला नव्हता.

प्रतिभा पाटील यांचा मुंबई दौरा टाळण्यात आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी ‘मातोश्री’वर जाऊन पाठिंब्याबद्दल शिवसेनाप्रमुखांचे आभार मानले होते, असे तेव्हा प्रतिभा पाटील यांच्या दौऱ्यांचे नियोजन करणारे व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी सांगितले.