मुंबई: मुंबई शहर तसेच उपनगरांत रविवारी ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. अनेक भागात विजांचा कडकडाटदेखील अनुभवायला मिळाला. दरम्यान, पुढील तीन चार तासांत मुंबईसह, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईसह अनेक भागात रविवारी ढगाळ वातावरणासह वारा वाहत होता. त्यानंतर पहाटे पावसाने हजेरी लावल्यावर दिवसभराच्या विश्रांतीनंतर सायंकाळी पावसाने पुन्हा जोर धरला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गेल्या २४ तासात ९.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर सांताक्रूझ केंद्रात ५.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
हेही वाचा… फॉरेक्स ट्रेडिंग अॅपद्वारे ३७ लाखांची सायबर फसवणूक; सायबर पोलिसांकडून एकाला अटक
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी देखील ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक भागात पडेल. दरम्यान, सोमवारी सकाळपासून वातावरण ढगाळ आहे. तसेच रविवारी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.