मुंबई : सध्या आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित व आमिर खान प्रोडक्शन्स निर्मित ‘सितारे जमीन पर’ या हिंदी चित्रपटाची तिकिट खिडकीवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने राष्ट्रपती भवनात जाऊन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचेही आयोजन करण्यात आले होते. हा चित्रपट विविधता, समता आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देत असल्याचे म्हणत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चित्रपटातील सर्व कलाकार व तंत्रज्ञांचे कौतुक केले.

हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथेचा संगम असणाऱ्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या निमित्ताने आमिर खान याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनातील कल्चरल सेंटर येथे भेट घेतली. याप्रसंगी राष्ट्रपतींनी चित्रपट पाहत कलाकार व तंत्रज्ञांचे कौतुक करीत त्यांच्याशी संवादही साधला. यासंदर्भात ‘एक्स’वरील (पूर्वीचे ट्विटर) ‘President of India’ या समाजमाध्यम खात्यावर माहिती देताना नमूद करण्यात आले आहे की, ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातील कल्चरल सेंटर येथे ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट न्यूरोडायव्हर्जंट स्थितीचा सामना करणाऱ्या खऱ्या व्यक्तींवर प्रकाश टाकून त्यांचे विविध पैलू दाखवतो. तसेच विविधता, समता आणि सर्वसमावेशकतेचा संदेशही देतो. चित्रपटाचे निर्माते आणि मुख्य अभिनेते आमिर खान हे चित्रपटामागील टीमसह विशेष स्क्रीनला उपस्थित होते’. या भेटीदरम्यान आमिर खानसह अभिनेत्री जिनिलिया देशमुख, चित्रपटातील विशेष कलाकार आदी मंडळी उपस्थिती होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचे कथानक विशेष मुलांच्या मध्यवर्ती फिरते. तसेच ‘सबका अपना अपना नॉर्मल’ असे घोषवाक्य असलेला हा चित्रपट सर्वांना स्वीकारण्याचा व सर्वसमावेशकतेचा संदेश देतो. या चित्रपटात आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशिष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर हे १० उदयोन्मुख तारे झळकत आहेत. तर प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकेत आहेत. तर या चित्रपटाचे गीतकार अमिताभ भट्टाचार्य, संगीतकार शंकर-एहसान-लॉय आणि पटकथा दिव्य निधी शर्मा यांची आहे.