मुंबई : सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या पीओपी गणेशमूर्तीचे विसर्जन समुद्रात व नैसर्गिक जलप्रवाहात करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्याच्या निर्णयाचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने स्वागत केले आहे. मात्र ही परवानगी केवळ एक वर्षासाठी असल्यामुळे उंच मूर्तीच्या विसर्जनासंदर्भातील हा निर्णय केवळ एकाच वर्षासाठी मर्यादित न ठेवता त्यावर कायम स्वरुपी तोडगा काढावा, अशी विंनती समन्वय समितीने राज्य शासनाकडे केली आहे.
गणेशोत्सवाला अवघा एक महिना शिल्लक असून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पीओपीच्या मूर्तींचा वाद न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले होते. उच्च न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सहा फुटांवरील गणेशमूर्तींचे समुद्रात किंवा अन्य नैसर्गिक जलस्रोतांत विसर्जन करण्यास परवानगी दिली. परंतु, हे आदेश केवळ माघी गणपतीपर्यंतच लागू असतील, असेही बजावले. न्यायालयाच्या या निर्णयाचे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने स्वागत केले आहे.
पीओपी मूर्तीच्या निर्मितीवरील बंदी न्यायालयाने यापूर्वीच रद्द केली होती. त्यामुळे उंच गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्तोतात विसर्जन करण्यास परवानगी मिळेल, अशी अपेक्षा समन्वय समितीने व्यक्त केली होती. न्यायालयाचा आताचा निर्णय मुंबईसह राज्यातील हजारो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा देणारा असल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी म्हटले आहे. यावर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या माघी गणेशोत्सवासाठी ही परवानगी देण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या पंरपरेला साजेसा हा निर्णय दिल्ल्याबद्दल बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुंबई उच्च न्यायालय आणि राज्य शासनाचे आभार मानले आहेत. तसेच उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तंतोतंत पालन करतील आणि प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करतील, असा विश्वास ॲड. दहिबावकर यांनी व्यक्त केला.
सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती १२ ते २० फूटांच्या…
ॲड. दहिबावकर पुढे म्हणाले की, सहा फूट किंवा त्याहून कमी उंचीच्या मूर्ती या बहुसंख्येने घरगुती आहेत. त्यांची संख्या तुलनेने जास्त असली तरी या मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे शक्य आहे. मात्र सार्वजनिक मंडळांमध्ये किमान १२ फुटांपासून २० फुटांपर्यंतच्या गणेश मूर्ती असतात. मंडळांकडून विसर्जनाची मिरवणूक निघते, त्यात हजारो माणसे सहभागी होतात. अशा गर्दीचे नियोजन करणे, तसेच सुरक्षित विसर्जन होण्यासाठी समुद्राचाच पर्याय तूर्त योग्य वाटतो.
वर्षानुवर्ष ही प्रथा सुरू असल्याने उंच मूर्तीबाबत या पर्यायाचा विचार करावा, अशी विनंती समन्वय समितीने शासनाला केली होती. तसेच याबाबत विस्तृत अहवाल समन्वय समितीने राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला होता, असे ॲड. दहिबावकर यांनी सांगितले.