अतिजलद अधिभार आकारणे बंद करण्याची मागणी
मुंबई : रेल्वे मंडळाच्या सूचनांनुसार दोन्ही दिशांना किमान सरासरी वेग ५५ किमी प्रतितास असणाऱ्या रेल्वेगाड्यांनाच ‘अतिजलद’ म्हणून गणण्याचा नियम आहे. गाडी क्रमांक १२१२६ पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेसचा वेग ५१ किमी प्रतितास इतकाच म्हणजेच, अतिजलद रेल्वेगाडीसाठी निर्धारित केलेल्या ५५ किमीच्या निकषापेक्षा कमी आहे. तरीही मध्य रेल्वेने तिचे वर्गीकरण सामान्य मेल/एक्स्प्रेस प्रकारात करून प्रवाशांकडून अतिजलद अधिभार घेणे बंद करावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
जून २०२५ पासून लागू केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार गाडी क्रमांक १२१२६ पुणे ते मुंबई प्रगती एक्स्प्रेस पुण्याहून सकाळी ७.४५ वाजता सुटते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.२५ वाजता पोहचते. याचाच अर्थ प्रगती एक्स्प्रेस आता पुणे ते मुंबई १८८ किमीचे अंतर कापायला ३ तास ४० मिनिटे घेते. तिचा सरासरी वेग ५१ किमी प्रतितास इतका आहे. त्यामुळे रेल्वे मंडळाच्या अतिजलद गाडीच्या तो निकषात बसत नाही. परंतु, या रेल्वेगाडीला अतिजलदचा दर्जा देऊन प्रवाशांकडून अतिजलद अधिभार घेऊन प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे.
रेल्वे मंडळाने २००६ मधील १०५ व्या निर्णय व रेल्वे मंत्रालयाने वारंवार दिलेल्या सुचनांनुसार दोन्ही दिशांंना किमान ताशी ५५ किमी किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना ‘अतिजलद’चा दर्जा दिला जातो. या रेल्वेगाडीतून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशांमागे तिकिट दरात एक्झिक्युटिव्ह वातानुकूलित, विस्टाडोम डबा आणि प्रथम श्रेणी वातानुकूलित डब्यांसाठी ७५ रुपये अतिजलद अधिभार आकारला जातो. वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबा, वातानुकूलित तृतीय श्रेणी डबा आणि वातानुकूलित चेअर कार डब्यासाठी ४५ रुपये, द्वितीय श्रेणी डब्यासाठी १५ रुपये असा अतिजलद शुल्क आकारण्यात येतो.
पुण्यावरून मुंबईला येणारी प्रगती एक्स्प्रेस रेल्वे मंडळाचे अतिजलदचे निकष पूर्ण करत नाही. मुंबईवरून पुण्याला जात असताना सुमारे ताशी ५५ किमी वेगाने धावते. मात्र, अतिजलद अधिभार प्रवाशांकडून घेताना दोन्ही दिशांनी रेल्वेगाडीचा वेग ५५ किमी असणे अपेक्षित आहे. यासह या रेल्वेगाडीला १५ ते २० मिनिटे विलंब देखील होतो. तरीही रेल्वे प्रशासनाकडून प्रगती एक्स्प्रेसचा अतिजलद अधिभार रद्द केला जात नाही. प्रवाशांकडून अतिजलद अधिभार घेणे बंद करण्याची मागणी आहे.– ईशान दाते, प्रवासी