मुंबई: लोकल ट्रेनमध्ये एका महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी ५ दिवसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण पोलिसांनी ५ हजार रुपये घेऊन मिटविल्याच्या आरोपानंतर पोलिसांनी तातडीने सारवासारव करत गुन्हा दाखल केला आहे. रेल्वे पोलीस आयुक्तांनी या विलंब आणि ‘तडजोड’ प्रकरणाची चौकशी सुरु केली असून रविवारी सायंकाळी मुख्यालयात दोन्ही महिलांचे जबाब नोंदविण्यात आले.
चर्चगेट विरार विशेष महिला लोकलमध्ये १७ जून रोजी कविता मेंदाडकर (३३) या महिलेला ज्योती सिंग (२७) या महिलेने मारहाण केली होती. ट्रेनमध्ये चढण्याचा वादातून हा प्रकार घडला होता. यावेळी ज्योतीने कविताच्या डोक्यात मोबाईल मारल्याने कविताचे डोके फुटून ती रक्तबंबाळ झाली होती. परंतु तरीही वसई रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. या प्रकाराची चित्रफित शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारीत झाल्यानतंर हा प्रकार उघडकीस आला. वसई रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल न करता ५ हजार रुपये घेऊन तडजोड केल्याचा आरोप मारहाण झालेल्या कविता मेंदाडकर या महिलेने केला होता.
रक्तबंबाळ होऊनही गुन्हा दाखल न करणे, ५ हजार रुपये घेऊन तडजोड करणे या आरोपांमुळे यामुळे वसई रेल्वे पोलिसांचे धाबे दणाणले होते. मनसेनेही याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांना जाब विचारला होता. अखेर शनिवारी पोलिसांनी दोन्ही महिलांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवून घेतले. कविताची तक्रार घेऊन मारहाण करणाऱ्या ज्योती सिंग (२७) या महिलेविरोधात प्राणघातक शस्त्राने हल्ला करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे आदीसाठी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१) आणि ३५२ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. कलम ११८ (१) अंतर्गत १० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे तर कलम ३५२ अंतर्गत २ वर्ष कारावास आणि दंड किंवा दोन्हीची तरतूद आहे.
रेल्वे आयुक्तालयाकडून स्वतंत्र चौकशी
रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. गुन्हा का दाखल केला नाही, तसेच तडजोडीच्या आरोपाबाबत रेल्वे पोलिसांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी रेल्वे पोलीस मुख्यालयात पीडित आणि आरोपी महिलांना जबाब नोंदविण्यासाठी बोलावण्यात आले होते.
प्रकरण काय?
कविता मेंदाडकर (३३) या विरारच्या फूलपाडा येथे राहतात. मंगळवार १७ जून रोजी सायंकाळी त्यांनी विरारला जाण्यासाठी मिरारोड रेल्वे स्थानकातून रात्री ७ वाजून ५७ मिनिटांची चर्चगेट-विरार महिला विशेष लोकल पकडली होती. त्यावेळी दारात उभ्या असलेल्या ज्योती सिंग (२७) या महिलेशी त्यांचा वाद झाला. शाद्बिक वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी ज्योतीने कविता यांचे केस ओढून डोक्यात मोबाईल मारला. त्यामुळे कविता यांच्या डोक्याला जखम झाली आणि त्या रक्तबंबाळ झाल्या. वसई रेल्वे पोलिसांनी कसलाही गुन्हा दाखल न करता ५ हजारात हे प्रकरण मिटवले, असा आरोप कविता मेंदाडकर यांनी केला आहे.