मुंबई, ठाणे : गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी वाढला. त्यामुळे राज्यातील काही भागांसह मुंबई, ठाणे, पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. पुराचा पाणीपुरवठा यंत्रणेला मोठा फटका बसला. त्यामुळे ठाणे शहरात तीन-चार दिवस कमी पाणीपुरठा होणार असून, कल्याण- डोंबिवली, टिटवाळा येथील पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे.
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात बुधवारी पावसाने जोर धरला. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाने दाणादाण उडवली. मुंबई उपनगरांत सखल भाग जलमय झाले. मुंबईत दादरमध्ये दिवसभरातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. लोकल विलंबामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांचे हाल झाले.
ठाण्यातही जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे पाणीपुरवठा यंत्रणेला मोठा फटका बसला. भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पिसे बंधाऱ्याजवळ पाणी उपसा करणाऱ्या पंपाच्या मुखाशी गाळ आणि कचरा अडकल्याने पुरेसा पाणीउपसा होत नसून, तीन ते चार दिवस ठाणे शहरात कमी प्रमाणात पाणीपुरवठा होईल. तसेच बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील जीवन प्राधिकरणाचे जलशुद्धीकरण केंद्र पुरामुळे बंद होण्याची भीती असून, प्राधिकरणाने पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले.
कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळय़ाचाही पाणीपुरवठा ठप्प होणार आह़े उल्हास, काळू, रायती नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. कल्याण-डोंबिवली पालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या टिटवाळा येथील जलशुध्दीकरण केंद्रात बुधवारी रात्री साडेनऊ वाजता काळू, उल्हास नदीचे पाणी शिरले. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्र बंद करण्यात आले, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली. त्यामुळे टिटवाळा, कल्याण-डोंबिवलीचा पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे. पुराचे पाणी ओसरताच जलशुध्दीकरण केंद्र सुरू करून शहरांचा पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे.
ठाण्यात पाऊस आणि रस्त्यांवरील खड्डयांमुळे वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र बुधवारी दिसत होते. ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरांतील सखल भागांत पाणी साचले होते. पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याने जिल्ह्यातील मुख्य तसेच अंतर्गत मार्गावर कोंडी झाली होती.
बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने ३०० हून अधिक जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच कर्जतच्या पावसामुळे बदलापुरावर पुन्हा पुराचे संकट निर्माण झाले. उल्हास नदी किनारच्या शाळाही रिकाम्या करण्यात आल्या. पूरस्थिती पाहून बदलापूरच्या नदी किनारी स्पीड बोट, रबर बोट, आवश्यक साधने आणि अग्निशमन कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत.
उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने सायंकाळच्या सुमारास बदलापूर -कर्जत राज्य मार्गावर पाणी साचण्यास सुरूवात झाली होती. बदलापूर- टिटवाळा मार्गावर दापिवलीजवळचा पुल आणि रायतेजवळचा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरची वाहतूक दुपारी ठप्प झाली होती. कल्याण -अहमदनगर महामार्गावर किशोर गावाजवळ मुरबाडी नदीच्या पाण्यामुळे महामार्ग दुपारी ठप्प झाला होता. माळशेज आणि अहमदनगरला जाणारी वाहतूक बंद होती. कल्याण, दुर्गाडी, डोंबिवलीजवळील खाडीजवळच्या सखल भागांत खाडीचे पाणी शिरले होते. भिवंडी येथील कामवारी नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदीकिनारच्या दिडशेहून अधिक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते.
दोन आठवडय़ांत सरासरीच्या दुप्पट पाऊस
ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन आठवडय़ांत ६८५.३ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३९५.२ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या दोन आठवडय़ांच्या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाला असून, अंबरनाथ तालुक्यात सर्वाधिक ७७१.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल ठाणे तालुक्यात ७२३.३ मिमी, भिवंडी तालुक्यात ७१६.८, कल्याण तालुक्यात ७१६.३ मिमी, उल्हासनगर तालुक्यात ७०६.२ मिमी, शहापूर तालुक्यात ६९६.१ तर मुरबाड तालुक्यात ४८६.४ मिमी इतका पाऊस झाला आहे. शहापूर तालुक्यातील तानसा आणि मोडक सागर धरण पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. यामुळे धरण परिसरातील १८ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पालघरमध्ये १२ जण अडकले
पालघर : पालघर तालुक्यातील बहाडोलीजवळ मुंबई- बडोदा द्रुतगती महामार्गावरील पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी १२ कर्मचारी नदीच्या पात्रात बोटीवर अडकले आहेत. वैतरणा आणि पिंजाळ नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. पावसामुळे मनोर- वाडा तसेच वाडा- भिवंडी रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, वसईत दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे गुरुवारी होणाऱ्या सर्व परीक्षा विद्यापीठाने रद्द केल्या आहेत. विद्यापीठाच्या क्षेत्रात मुंबईसह, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हे येतात. या परीक्षांची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
शाळांना सुट्टी
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे, पालघर क्षेत्रातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील शाळांबाबत मात्र पालिकेने रात्री उशिरापर्यंत निर्णय जाहीर केला नाही. मात्र, शहरातील अनेक शाळांनी गुरुवारी सुट्टी दिली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन मुंबई विभागातील शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणाने निर्णय घ्यावा, अशा सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिल्या आहेत.